Pimpri

महापालिकेतील भाजपच्या काळातील भ्रष्टाचाराच्या चौकशा लागणार – अजित गव्हाणे

By PCB Author

June 02, 2022

पिंपरी, दि. १ (पीसीबी)- भाजपच्या सत्ता काळात महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. यामधील विविध प्रकरणाच्या येत्या काळात चौकशा लागणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांनी सांगितले. तसेच आगामी सार्वत्रिक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे 100 पेक्षा अधिक नगरसेवक निवडून येतील आणि आमचाच महापौर होईल असा दावाही त्यांनी केला.

उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार येत्या (शुक्रवारी) पिंपरी-चिंचवड शहर दौऱ्यावर येणार आहेत. महापालिकेने केलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन आणि भूमिपूजन पवार यांच्या हस्ते होणार आहेत. दुपारी चिंचवड येथील प्रा. रामकृष्ण मोरे प्रेक्षागृहात पक्षाचा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात पक्षाच्या कार्यकारणीची घोषणा आणि पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्राचे उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते वाटप करण्यात येणार आहे. निगडीत झालेल्या पत्रकार परिषदेला युवकचे शहराध्यक्ष इम्रान शेख, महिला अध्यक्षा कविता आल्हाट, पिंपरी विधानसभा अध्यक्ष शाम लांडे,चिंचवड विधानसभा अध्यक्ष विनोद नढे, भोसरी विधानसभा अध्यक्ष पंकज भालेकर, माजी नगरसेवक भाऊसाहेब भोईर, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, विनायक रणसुभे उपस्थित होते.

भाजपने पाच वर्षांच्या राजवटीत नागरिकांना दिलेल्या आश्‍वासनांची पूर्तता केली नाही. महापालिकेत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. यामधील काही प्रकरणाची चौकशीही सुरू झाली आहे. येत्या काळात आणखी काही प्रकरणाच्या चौकशा लागणार आहेत. तसेच महापालिका प्रशासक तथा आयुक्त राजेश पाटील यांनी महापालिकेच्या प्रशासकीय इमारतीसाठी 312 कोटींच्या निविदा प्रसिध्द करण्याचा धोरणात्मक निर्णय कसा काय घेतला? हा निर्णय खटकणारा आहे, असेही शहराध्यक्ष गव्हाणे म्हणाले.