Pimpri

महापालिकेतील अनुसूचित जातीच्या पदांचा अनुशेष भरा

By PCB Author

June 17, 2022

– माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाचे समितीकडे मागणी

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड शहरात राज्याच्या विविध भागातून नोकरी, शिक्षणासाठी येणाऱ्या अनुसूचित जाती प्रवर्गातील नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. या प्रवर्गातील नागरिकांसाठीच्या विविध कल्याणकारी योजनांची अंमलबजावणी व्हावी. तसेच महापालिकेतील मंजूर आकृतिबंधानुसार अनुसूचित जातीच्या पदांचा अनुशेष भरून काढावा, अशा विविध मागण्या भाजपच्या माजी नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने अनुसूचित जाती कल्याण समितीकडे केल्या आहेत.

समितीची गुरूवार (दि.16) रोजी महापालिका भवनात बैठक झाली. या बैठकीसाठी आलेल्या समितीच्या प्रमुख आमदार प्रणिती शिंदे यांना भाजपचे माजी नगरसेवक बाबासाहेब त्रिभुवन, विनायक गायकवाड, सागर आंगोळकर, अंबरनाथ कांबळे, संतोष कांबळे, बाळासाहेब ओव्हाळ, माजी नगरसेविका ममता गायकवाड, शोभा आदियाल यांच्या शिष्टमंडळाने त्यांना निवेदन दिले.

त्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील अनुसूचित जाती प्रवर्गाच्या कल्याणाकरिता योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. महापालिकेतील मंजूर आकृतिबंधनुसार अनुसूचित जातीच्या पदांचा अनुशेष भरावा. समाज विकास विभागातील मागासवर्गीय कल्याणकारी निधी वाढविण्यात यावा, निधीचे इतर विकास कामांसाठी वर्गीकरण करण्यास मनाई करण्यात यावी. माता रमाई आवास योजनेची अंमलबजावणी योग्य प्रकारे करण्यात यावी. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सर्व प्रकरच्या उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपचा लाभ मिळावा. कंत्राटी पद्धतीने भरती केली जाणाऱ्या नोकर भरतीत मागासवर्गीयांसाठी राखीव जागा ठेवाव्यात, चतुर्थ श्रेणीच्या पदभरतीमध्ये लाड समितीच्या शिफारशीमध्ये अंमलबजावणी करण्यात यावी. माता रमाई पुतळ्याचे मंजूर असलेल्या कामाची तातडीने सुरुवात करावी, अशा विविध मागण्यात समितीकडे करण्यात आल्या आहेत.