Maharashtra

महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव

By PCB Author

June 01, 2021

मुंबई, दि.०१ (पीसीबी) : मुंबई महापालिकेच्या निवडणुका पुढे ढकलल्या जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यावरून आता भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. महापालिकेच्या निवडणुका दोन वर्षासाठी पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन मुंबई महापालिका निवडणुकीच्या मुद्दयावरून शिवसेनेला घेरले. मुंबई महापालिका निवडणुकीची चर्चा सुरू झाल्यापासून शिवसेनेची काही खलबतं आणि कटकारस्थानं सुरू आहेत. यावर भाजप लक्ष ठेवून आहे. आपली हार लक्षात घेऊन शिवसेनेने पळवाट काढण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असं सांगातनाच शिवसेनेने निवडणूक आयोगाच्या आड राजकारण करू नये. दोन वर्ष निवडणुका पुढे ढकलण्याचा शिवसेनेचा डाव आहे. शिवसेनेचा हा डाव आम्ही हाणून पाडू, असा इशारा शेलार यांनी दिला.

शिवसेनेचे तीन डाव गेल्या दीड वर्षात शिवसेनेने अनेक कट रचले. पहिली कोरोनाची लाट आल्याने मे महिन्यातच मुदतपूर्व निवडणुका घेण्याचा त्यांचा डाव होता. मात्र दुसरी लाट आल्याने त्यांचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर दुसरा डाव टाकला. महापालिकेची प्रभाग रचना भाजपला पूरक असल्याचा आरोप करत ही प्रभाग रचना बदलण्याचाही प्रयत्न झाला. पण तो प्रयत्नही फसला. आता तिसरा प्रयत्न लपूनछपून करण्यात येत आहे. कोरोनाच्या नावाखाली अनेक गोष्टी केल्या जात आहेत. जनगणना करता येत नाही. नवी मतदार नोंदणी करताना अधिक वेळ लागेल. त्यामुळे महापालिकेला दोन वर्षे मुदत वाढ देण्याचा प्रयत्न सुरू आहे, असा आरोप त्यांनी केला.

मुंबईतील 30 वॉर्ड आहेत. ते शिवसेना आणि काँग्रेसला आजन्म जिंकता येणार नाहीत. त्यामुळे या वॉर्डांमध्ये फोडाफोडीचं राजकारण सुरू आहे, असं सांगतानाच ‘बंदूक भी तेरी, गोली भी तेरी, दिन-तारीख भी तेरी, दिन कहे दिन, शाम कहे शाम, शिवसेना को परास्त करने भाजप तयार है’, अशा शब्दात त्यांनी शिवसेनेवर निशाना साधला.

गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा यावेळी त्यांनी नालेसफाईच्या मुद्द्यावरूनही शिवसेनेवर टीका केली. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही वाद्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवालही त्यांनी केला. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असं आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा दावाही त्यांनी केला.

मुंबई फक्त वरळीपुरती मर्यादित आहे का? मुंबई वरळीपुरती मर्यादित राहिलीय का? जम्बो कोव्हिड सेंटर, फूटपाथ, ट्रॅफिक सिग्नल सगळं काही वरळीतच होत आहे. वरळी सिलिंकवरून गाडी निघते ते थेट वांद्रे पूर्वमध्ये निघते. पावसाचं पाणी तुंबू नये यासाठी पम्प फक्त कलानगर सिग्नललाच बसतात. मुंबई सगळ्यांची आहे, विकास सगळ्यांचा व्हावा ही आमची मागणी आहे, असंही ते म्हणाले.