महापालिकेची सर्वसाधारण सभा ‘व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे’ लवकरच निर्णय – सभागृह नेते नामदेव ढाके

0
454

पिंपरी, दि. 27 (पीसीबी) : कोरोनामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा तीन महिन्यांपासून झालेली नाही. अर्थसंकल्पाच्या मंजुरीसाठी सभा घेण्याचे नियोजन आहे. या सभेला काही नगरसेवकांना प्रत्यक्ष सभागृहात उपस्थित राहून, तर काही नगरसेवकांना ‘व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे’ सहभागी करता येईल का, याबाबतीत गटनेत्यांबरोबर चर्चा झाली.
त्यानुसार सर्वसाधारण सभा घेण्याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येईल, असे महापालिकेतील सभागृह नेते नामदेव ढाके यांनी पत्रकाराना सांगितले.

महापालिकेची सर्वसाधारण सभा दर महिन्यातून एकदा घेण्यात येते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव विचारात घेऊन गेले तीन महिने सभा तहकूब करण्यात आली होती. त्यामुळे बजेट सारख्या अनेक महत्त्वाच्या कामांना सभेची मंजूर घेणे आवश्यक आहे.

याबाबत महापौर उषा ढोरे यांनी आज आयुक्त कक्षात सर्वपक्षीय गटनेते यांच्यासोबत बैठक घेतली.
यावेळी ढ़ाके यांच्या सह स्थायी समिती सभापती संतोष लोंढे, विरोधी पक्षनेते  नाना काटे, आयुक्त श्रावण हर्डीकर, मनसे गटनेते सचिन चिखले, अपक्ष आघाडी गटनेते कैलास बारणे, नगरसचिव उल्हास जगताप, मुख्य माहिती व तंत्रज्ञान अधिकारी निळकंठ पोमण उपस्थित होते.

यावेळी 1 जून रोजी सर्वसाधारण सभा घेण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच काही नगरसेवकांना सभागृहात उपस्थित राहून तर काही नगरसेवकांना व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी करता येईल का याबाबतीत गटनेत्यांबरोबर चर्चा झाली आहे.