Pimpri

महापालिका शहरात 9 पाणी टाक्या उभारणार

By PCB Author

January 13, 2022

पिंपरी, दि. १३ (पीसीबी) – पिंपरी- चिंचवड महापालिका शहराच्या विविध भागात 9 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) उभारणार आहे. टाक्याचे काम पूर्ण झाल्यावर  21.5 दक्षलक्ष लीटर क्षमतेने पाणी साठवण क्षमता वाढणार असल्याचा दावा महापालिकेने केला आहे. 1100 मि.मी व्यासाची माइल्ड स्टीलची 6 किमी लाईन चिखली जलशुद्धीकरण ते सेक्टर 7-10 पर्यंत टाकण्यात येणार आहे. त्यामुळे नवीन जलशुद्धीकरण केंद्रामधून पाणीपुरवठा करणे शक्य होणार आहे.

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पॅकेज तीन अंतर्गत वाकड, थेरगाव, सेक्टर 7,10 आणि भोसरीत पाण्याची मुख्य नलिका टाकणे,   शहराच्या विविध भागातील 9 ठिकाणी उंच पाण्याच्या टाक्या (जलकुंभ) उभारणे आणि 1 पंप हाऊस उभारुन कार्यान्वित करण्यासाठी निविदा मागविल्या होत्या. निविदा रक्कम 64 कोटी 65 लाख 82 हजार रुपये इतकी होती.  निविदा प्रक्रियेत 6 ठेकेदारांनी सहभाग घेतला होता. त्यापैकी रुद्राणी इन्फ्रास्ट्रक्चर या ठेकेदाराची निविदा रकमेच्या 0.99 टक्के कमी दराने निविदा आलेली आहे. तुलनात्मकदृष्ट्या वाजवी दराची आणि ठेकेदार 24 महिन्याच्या मुदतीत काम पूर्ण करण्यास सक्षम असल्याने आयुक्त राजेश पाटील यांनी 6 जानेवारी 2022 रोजी ही निविदा स्वीकारण्यास मान्यता दिली. रॉयल्टी व मटेरियल टेस्टींग चार्जेसह 64 कोटी 19 लाख रुपयात ठेकेदाराकडून काम करुन घेण्यास आणि त्यांच्यासोबत करारनामा करण्यास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली.