महापालिका निवडणुकित नागरिकांचाही जाहीरनामा

0
344

– शहरातील एनजीओ प्रतिनिधींच्या पहिल्याच बैठकीत गांभिर्याने चर्चा

पिंपरी, दि. १० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड शहर देशात सर्वोत्कृष्ट व्हावे यासाठी आता विविध उपक्रमांतील नागरिकांचा सहभाग वाढतो आहे. दोन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिका सार्वत्रिक निवडणुकिसाठी नागरिकांचा जाहीरनामा असावा म्हणून शहरात वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे ४० स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी आता एकत्र आले आहेत. पाणी, स्वच्छता, रस्ते, पूल, शिक्षण, आरोग्य, क्रिडा, कला, पर्यावरण, नदी सुधार यासह महिला, बालक, जेष्ठ नागरिकांसाठी आवश्यक कामांबाबत अत्यंत आग्रही भूमिका निवडणूक काळात मांडायची आणि पुढचे पाच वर्षे त्याचा सतत पाठपुरावा करायचा, असा महत्वाचा निर्णय या बैठकित घेण्यात आला. सर्वसमावेशक असा स्वतंत्र जाहिरनामा तयार करुण त्यावर जनतेमध्ये चर्चा घडवून आणायची, राजकिय पक्षांना त्यासाठी आग्रह करायचा असाही या संस्थांचा प्रयत्न आहे. महापालिकेच्या सर्वच विकास कामांत लोकप्रतिनिधींबरोबरच नागरिकांचाही सहभाग असलाच पाहिजे, अशी भूमिका सर्वांनी यावेळी मांडली.

प्राधिकऱणातील स्वातंत्रवीर सावरकर सदनात शनिवारी (दि.८ जानेवारी) ही बैठक पार पडली. कोरोनाचे सर्व नियम पाळून मोठ्या संख्येने प्रतिनिधी उपस्थित होते. पिंपरी चिंचवड सिटीझन फोरम (पीसीसीएफ) ने या उपक्रमासाठी पुढाकार घेतला आहे. संस्था प्रतिनिधींबरोबरच विविध तज्ञ सुध्दा सहभागी झाले होते. प्राथमिक सुविधांबरोबरच राहण्यासाठी अधिक योग्यतेचे आपले शहर व्हावे म्हणून महापालिका काय काय करू शकते याबाबतच्या अनेक सुचना यावेळी आल्या.

शहराची वगाने वाढणारी लोकसंख्या विचारात घेता पिण्याच्या पाण्याचे आगामी काळातील नियोजन तसेच कचरा, ड्रेनेज, नदी प्रदुषणावर दिर्घ नियोजन कसे करता येईल यावर ठोस कार्यक्रम आणि मंथन आवश्यक असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले.

शहरातील उद्योग, सामाजिक सुरक्षा, कायदा सुव्यवस्था, एतिहासिक वारसा, पर्यावरण, नदी प्रदुषण, वृक्षारोपण व संवर्धन, अपारंपारीक उर्जा, शहरांतर्गत वाहतूक, शहराचा विकास आराखडा, बालकांचे हक्क, युवकांसाठी कौशल्य विकास, महिला व जेष्ठ नागरिकांसाठीच्या सेव-सुविधा, शिक्षण, क्रीडा, स्वच्छता (कचरा), हाऊसिंग सोसायट्यांचे प्रश्न आदी मुद्यांवर उहापोह झाला.

शहरातील नागरिकांनाही या उपक्रमात सुचना देता येतील. त्यासाठी पुढील लिंक आहे. (https://surveheart.com/form/61da70b728821d18acb09cff)