Pimpri

महापालिका कर्मचाऱ्यांसाठी गणवेशाचे धोरण ठरविणार;अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे यांची माहिती

By PCB Author

January 17, 2023

पिंपरी, दि. १७ (पीसीबी) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आस्थापनेवरील गणवेश देय कर्मचाऱ्यांच्या गणवेशाचे धोरण ठरविण्यात येणार आहे. सद्यस्थितीतील गणवेशामध्ये बदल करायचा असल्यास त्याबाबतची मागणी संबधित विभागामार्फत कामगार कल्याण विभागाकडे करावी, असे अतिरिक्त आयुक्त प्रदिप जांभळे पाटील यांनी परिपत्रकाद्वारे सर्व विभागप्रमुखांना कळवले आहे.

 महापालिकेच्या आस्थापनेवरील गणवेश देय कर्मचाऱ्यांना गणवेशाची रोख रक्कम देण्याबाबतचा निर्णय समितीमार्फत घेण्याकामी तसेच धोरण ठरवण्यासाठी महापालिका आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली सर्व संबधित अधिकाऱ्यांची एकत्रित समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यानच्या कालावधीत काही विभागातील अधिकारी, कर्मचारी तसेच महानगरपालिका महासंघाची गणवेशामध्ये बदल करण्याबाबतची मागणी कामगार कल्याण विभागाकडे प्राप्त झाली होती. त्या अनुषंगाने गणवेश देय कर्मचाऱ्यांनी सद्यस्थितीतील गणवेशामध्ये बदल करायचा असल्यास त्याबाबतची मागणी संबधित विभागामार्फत कामगार कल्याण विभागाकडे 23 जानेवारी 2023 पूर्वी सादर करावी असे आवाहन कामगार कल्याण विभागाच्या वतीने सर्व विभागांना परिपत्रकाद्वारे करण्यात आले आहे.  

गणवेश देय कर्मचाऱ्यांमध्ये मजूर, कचराकुली, स्प्रेकुली, कंपोष्टकुली, डॉग पिग स्कॉड कुली, पुरुष व महिला सफाई कामगार, सफाई सेवक, गटरकुली, माळी, न्हावी, पेंटर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक, रंगमंच मदतनीस, अतिक्रमण निरीक्षक, वीज पर्यवेक्षक, मंडई निरीक्षक, मिळकतकर निरीक्षक, वाहनचालक, लिफ्टमन, सर्व्हेअर, रोपविक्रेता, प्लंबर, रोड रोलर चालक, गाळणी ऑपरेटर, मुकादम, मीटर निरीक्षक, सुतार, आरोग्य निरीक्षक, मुख्य आरोग्य निरीक्षक, असिस्टंट हॉर्टीकल्चर सुपरवायझर, सहायक उद्यान निरीक्षक, हॉर्टीकल्चर सुपरवायझर, उद्यान निरीक्षक, उद्यान सहायक, कार्यालयीन शिपाई (महिला व पुरुष), आया, नाईक, वॉर्डबॉय, लॅब टेक्नीशियन, कम्पाउंडर, फार्मासिस्ट, एक्स-रे टेक्नीशियन, मलेरिया सुपरवायझर, व्यायामशाळा मदतनीस, असिस्टंट लॅब टेक्नीशियन, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य, विद्युत), रखवालदार (पुरुष,महिला), सुरक्षा पर्यवेक्षक, सुरक्षा अधिकारी, सहायक सुरक्षा अधिकारी, वीजतंत्री, वायरमन, जनरेटर ऑपरेटर, उप  मुख्य अग्निशामक अधिकारी, सब ऑफिसर, फायरमन, लिडिंग फायरमन, वाहनचालक अग्निशामक, वैद्यकीय अधिकारी, पशु वैद्यकीय अधिकारी, केमिस्ट, असिस्टंट केमिस्ट, गाळणी निरीक्षक, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, बी.सी.जी. टेक्नीशियन, नेत्रचिकित्सा सहायक, कार्यव्यवस्थापक, सहायक कार्यव्यवस्थापक, कनिष्ठ अभियंता (मेकॅनिक), फिटर, मेंटेनन्स हेल्पर, जीवरक्षक कम मदतनीस, महिला व पुरुष निदेशक, गट निदेशक (आय.टी.आय.), परिचारिका, सर्पोद्यान मजूर, ए.एन.एम., एन.एम, मल्टी पर्पज वर्कर आदी पदांचा समावेश आहे.