महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना बढती, बदली नाही

0
463

पिंपरी, दि. ३० (पीसीबी) – पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या बदलीच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला आहे. आहे त्याच पदावर त्यांनी बढती देण्यात आली असून ते महापालिका आयुक्त म्हणून कायम राहणार आहेत. राज्य सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव (सेवा) सुजाता सौनिक यांनी त्याबद्दलचे पत्र आयुक्त हर्डीकर यांनी आज दिले. १ जानेवारी २०२१ पासून सद्याच्याच पदावर स्थानापन्न पदोन्नती देण्यात येत असल्याचे या पत्रात स्पष्ट म्हटले आहे.

भाजपाची सत्ता असलेल्या पिंपरी चिंचवड महापालिकेत आयुक्त म्हणून गेले पावणे चार वर्षे हर्डीकर हे कायम आहेत. राज्यात भाजपाची सत्ता जाऊन महाआघाडीची सत्ता आली त्यावेळेपासून त्यांच्या बदलीची चर्चा सुरू आहे. प्रत्यक्षात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांची कार्यपध्दती पाहून त्यांनाच कायम ठेवण्याचा निर्णय केला. कोरोना काळात देशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पिंपरी चिंचवड शहरातील परिस्थिती गेले आठ महिने सुट्टी न घेता अहोरात्र कष्ठ घेऊन ज्या पध्दतीने हाताळली त्याबद्दल सर्वत्र त्यांची वाहव्वा सुरू आहे. तीन वर्षांची मुदत संपल्या नंतर आता यापुढेही काही काळ तेच आयुक्त म्हणून कामकाज पाहणार असल्याचे आता स्पष्ट झाले.

ठेवी कायम ठेवत उत्तन्न वाढविले –

आयुक्त श्रावण हर्डीकर हे पावणे चार वर्षांपूर्वी (२७ एप्रिल २०१७) नागपूर महापालिका आयुक्त पदावरून पिंपरी चिंचवड आयुक्त म्हणून बदलून आले. ते आल्यापासून त्यांच्यावर भाजपाचा शिक्का होता, प्रत्यक्षात ते अत्यंत निपःक्षपाती असल्याचे दिसले. कोरोना काळातही त्यांनी महापालिकेची आर्थिक घडी सुरळीत ठेवली आणि उत्पन्नाचे स्त्रोत वाढविले. पुणे महापालिकेला कोरोना संकटावर मात कऱण्यासाठी ठेवी मोडायची वेळ आली.परंतु हर्डीकर यांनी ठेवी कायम ठेवत उत्तन्न वाढविले. किरकोळ दुरुस्तीच्या नावावर होणारी लूट थांबवून धोरणात्मक निर्णय आणि महत्वाचेच प्रकल्प त्यांनी राबविल्याने महापालिकेची आर्थिक परिस्थिती आता एकदम

मजबूत झाली आहे. मिळकतींचे उपग्रहामांर्फत सर्वेक्षण करून नोंद करायची आणि करआकारणी करायची नवीन पध्दत त्यांनी आरंभली. त्यातून आजवर न नोंदलेल्या हजारो मिळकती सापडल्या आणि उत्तन्न वाढविले आहे. सत्ताधारी भाजपामधील पक्षांतर्गत गटबाजीच्या राजकारणात आयुक्त हर्डीकर यांची नाहक बदनमी झाली. सुरवातीला त्यांना नावे ठेवणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतेही आता त्यांच्या कामाची वाहवा करत आहेत.

पाणी पुरवठ्याचे प्रकल्प मार्गी लावले-

महापालिका आयुक्त हर्डीकर यांनी सर्वात महत्वाची धोरणात्मक कामे केली. शहरातील वाहनांची संख्या, रस्ते आणि वाहतूक कोंडी पाहून पार्कींग पॉलिसीचा अत्यंत मोठा निर्णय त्यांना मंजूर करून घेतला. २०१७ मध्ये महापालिकेची गंगाजळी आटली होती. त्यावर उपाय म्हणून नवीन मिळकती नोंदविण्याची मोहीम राबविली. पर्यावरण विषयावर यापूर्वी फक्त अहवाल येत होते, पण हर्डीकर यांनी नदी सुधार प्रकल्पाचा सुमारे ५०० कोटींचा आराखडा तयार करून कामाला सुरवातही केली. निगडी ते पिंपरी आणि नाशिकफाटा ते भोसरी मार्गे चाकण या मेट्रो मार्गाचा डिपीआर त्यांनी वेळेत तयार करून दिला. शहरासाठी अत्यंत महत्वाचा विषय म्हणजे पाणीपुरवठा. कमी दाबाने, अपुरे पाणी येत असल्याच्या रोज शेकडो तक्रारी येत होत्या. २४ तास पाणी योजनेबरोबर अचूक नियोजन करून समान पाणी वाटपासाठी दिवसाआड पाणी पुरवठा सुरू केला. आता ९० टक्के तक्रारी कमी झाल्या. आगामी २५ वर्षांचा विचारकरून शहराची वाढ लक्षात घेऊन भामा आसखेड पाणी योजनेची मंजूरी आणि प्रत्यक्षात कार्यवाही त्यांच्याच काळात झाली.

राज्यात सर्वात प्रथम पंतप्रधान आवास योजनेची अंमलबजावणी श्रावण हर्डीकर यांनी सुरू केली आणि सुमारे १० हजार घरांचे काम सुरूही केले. स्मार्ट सिटी अंतर्गत सिमेंट रस्ते, केबल अशी सुमारे दोन हजार कोटींची काम त्यांच्यात कारकिर्दीत सुरू झाली. शहरातील कायदा सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी ३५०० सीसी कॅमेरे बसवून पोलिस खात्याकडे नियंत्रण सोपविण्यात येणार आहे. त्याशिवाय हिंजवडी, आळंदी या परिसरासाठीही असे नियोजन केले आहे. महापालिका शाळांची शैक्षणिक गुणवत्ता वाढविण्यासाठीही एक धोरण त्यांनी तयार केले. शहर परिवरतन आराखडा त्यांनी करवून घेतला आणि हे शहर संधीचे शहर असल्याचे दाखवून दिले.