महापालिका आयुक्तांची बदली करू नये; माजी सत्तारूढ पक्षनेते एकनाथ पवार यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

0
318

पिंपरी, दि. 28 (पीसीबी) : शिस्तप्रिय म्हणून पिंपरी-चिंचवड महापाकिलेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची ख्याती आहे. पिंपरी-चिंचवड शहरात कोरोना प्रतिबंधक उपाययोजना करण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. परिणामी, शहरात कोरोना नियंत्रणात आहे. त्यामुळे त्यांची बदली करू नये, अशी मागणी माजी सत्तारूढ पक्षनेते व भाजपचे नेते एकनाथ पवार यांनी गुरूवारी (दि.28) केली आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठविलेल्या निवेदनात एकनाथ पवार यांनी म्हटले आहे की, पुणे जिल्ह्यात आतापर्यंत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या तब्बल 5 हजार वर गेली आहे. तर, पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोनाबाधितांची संख्या खूप कमी आहे. आयुक्त हर्डीकर आणि त्यांची टीम कोरोनाचा विळखा रोखण्यासाठी दिवसरात्र प्रयत्न करीत आहेत. त्यामुळे शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आहे. कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण 65 टक्क्यांच्या वर आहे. तसेच, शहरात विविध उपाययोजना तातडीने राबविल्या जात आहेत, असे एकनाथ पवार यांनी म्हटले आहे.

शहरातील कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावी व  व्यापक होऊन शहरातील कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्यात आयुक्त हर्डीकर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे त्यांची बदली करण्यात येऊ नये. प्रशासकीय दृष्ट्या त्यांची बदली करणे अन्यायकारक आहे, असे पवार यांनी निवेदनात म्हटले आहे.

शेजारच्या पुणे शहरातील कोरोना प्रतिबंधक कार्यवाही अधिक प्रभावी व गतिमान करण्यासाठी चार वरिष्ठ प्रशासकीय अधिकार्‍यांची नियुक्ती केली गेली आहे. पिंपरी-चिंचवडमध्येे आयुक्त हर्डीकर हे स्वत: कोरोना प्रतिबंधक उपाययोजनाबाबत तत्परतेने पावले उचलत आहेत. 

दरम्यान, जर आयुक्त हार्डीकर यांची बदली झालीच तर पिंपरी चिंचवड महापालिकेच्या नव्या आयुक्तांच्या नेतृत्वाखाली कोरोना बाधितांची संख्या जर वाढली, तर त्याला राज्य सरकार जबाबदार राहील असे ही एकनाथ पवार यांनी नमूद केले आहे.