महापालिका आयुक्तांकडून पिंपळेसौदागरमध्ये “स्मार्ट सिटी”चे सादरीकरण; शत्रुघ्न काटे युथ फौंडेशनकडून आयोजन

0
872

चिंचवड, दि. १७ (पीसीबी) – पिंपळे सौदागर येथे शत्रुघ्न काटे युथ फौंडेशनच्या वतीने स्मार्ट सिटी प्रोजेक्टविषयी नागरिकांशी संवाद आणि प्रोजेक्टचे सादरीकरण करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी स्मार्ट सिटी प्रकल्प काय आहे? ती कशी असणार आहे? याबाबत तब्बल दीड तास संगणकीय सादरीकरण केले. त्याचप्रमाणे त्यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांना स्मार्ट सिटीबाबत पडणारे प्रश्न जाणून घेतले. तसेच त्यांच्याशी चर्चा करत स्मार्ट सिटीसंदर्भात सूचना मागविल्या. नागरिकांनी देखील यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप व नगरसेवक शत्रुघ्न काटे यांच्याशी दिलखुलासपणे मुक्त चर्चा केली.

यावेळी सहशहर अभियंता राजन पाटील, स्मार्ट सिटीचे निळकंठ पोमण, नगरसेविका निर्मला कुटे, ज्येष्ठ पत्रकार अविनाश चिलेकर, जयनाथ काटे, स्वीकृत सदस्य संदीप नखाते, उन्नती सोशल फौंडेशनचे कुंदा संजय भिसे, वसंत काटे, चंदा भिसे, सितेश अग्रवाल, अमित तलाठी यांच्यासह विविध सोसायटीतील चेअरमन, सदस्य व परिसरातील नागरिक, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आयुक्त श्रावण हर्डीकर म्हणाले, “नागरिकांच्या सहभागाशिवाय कोणतीही योजना किंवा कोणतेही काम पूर्ण होत नाही. त्यामुळे आपला परिसर, आपले शहर देशपातळीवर स्मार्ट करायचे असेल तर शहरातील प्रत्येक नागरिकांनी स्मार्ट झाले पाहिजे. पिंपळे सौदागर व पिंपळे गुरव असा एकूण तेराशे एकरचे क्षेत्र स्मार्ट करण्यासाठी घेतले आहे. हा परिसर म्हणजे लॅब असणार आहे. हा प्रोजेक्ट यशस्वी झाल्यानंतर आपला परिसर पाहण्यासाठी, आपल्या शहराला भेट देण्यासाठी देशातून लोक येतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.”

आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, “शहर स्मार्ट होण्यासाठी आगोदर नागरिक स्मार्ट होणे, त्यांचे विचार स्मार्ट होणे आवश्यक आहे. महापालिकेने अनधिकृत बांधकामे झाल्यानंतर त्यावर कारवाई करण्यापेक्षा ती होणार नाहीत याची काळजी घ्यावी. कारण अनधिकृत बांधकामांमुळे वीज, रस्ते, पाणी यांसारख्या इतर नागरी सुविधांवर ताण पडतो. शहराचे नियोजन बिघडते. ज्या सुविधा शहरवासीयांना मिळायला पाहिजेत त्या मिळत नाहीत. त्यामुळे अनधिकृत बांधकाम मी घेणार नाही आणि करणारही नाही, रस्त्यावर अनधिकृत हातगाडीवर मी काहीही खरेदी करणार नाही, असा विचार सर्वांनी केला तर निश्चितच आपले शहर बदलायला वेळ लागणार नाही.”

नगरसेवक शत्रुघ्न काटे म्हणाले, “पिंपळे सौदागर परिसर हा मुळातच स्मार्ट आहे. परंतु हे शहर देशपातळीवर कसे स्मार्ट होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे. स्मार्ट शहराच्या दृष्टीने पालिका प्रशासन वेळोवेळी प्रयत्न करत आहे. त्यामुळे आपण देखील एक जबाबदार नागरिक म्हणून पुढाकार घेतला पाहिजे. त्यासाठी आमदार लक्ष्मण जगताप हे देखील वारंवार मार्गदर्शन करत आहेत.”

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सागर बिरारी यांनी केले.