Maharashtra

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस – मुख्यमंत्री

By PCB Author

August 07, 2018

मुंबई, दि. ७ (पीसीबी) – स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवणारे थोर समाज सुधारक महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस राज्य सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील वरळी येथे ओबीसी महासंघाच्या महाअधिवेशनात दिली. 

दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी मार्च २०१८ मध्ये लोकसभेत ही मागणी केली होती. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्याच्या पहिल्याच दिवशी सुप्रिया सुळेंनी ही मागणी केली होती. तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही २०१५ मध्येच महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न मिळण्यासाठी प्रयत्नशील असल्याची घोषणा केली होती.

१९५४ मध्ये चक्रवर्ती राजगोपालाचारी यांना पहिला भारतरत्न पुरस्कार मिळाला होता. आतापर्यंत ४५ जणांना या पुरस्काराने गौरव करण्यात आला आहे. २०१५ मध्ये मदनमोहन मालवीय आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना भारतरत्न देण्यात आला होता. त्यानंतर भारतरत्न कोणालाही जाहीर करण्यात आलेला नाही.