Maharashtra

महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार ?

By PCB Author

January 10, 2019

नवी दिल्ली, दि. १० (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोठे निर्णय घेण्याचा सपाटा लावला आहे. महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाचे प्रणेते महात्मा जोतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार हा सर्वोच्च नागरी किताब देण्याचा विचार मोदी सरकार करत आहे. याबाबत २६ जानेवारीरोजी अंतिम घोषणा होण्याची शक्यता आहे.

तसेच उत्तर प्रदेशातील दलित नेते काशीराम यांच्या नावाचाही भारतरत्न पुरस्कारासाठी विचार सुरू असल्याचे सांगितले जात आहे. नुकत्याच झालेल्या मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगढ या तीन राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे आगामी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर मोदी सरकारने कंबर कसून कामाला सुरूवात केली आहे. सर्व समाज घटकांतील मतदारांना आपल्याकडे पुन्हा आकृष्ट करण्यासाठी  मोदींनी रणनीती आखली आहे.

दरम्यान, दोन दिवसापूर्वी केंद्र सरकारने  सवर्ण वर्गातील आर्थिक दुर्बलांना १० टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतला होता.  सरकारने विरोधकांना यावर आक्षेप घेण्याची कोणतीही संधी न देता अवघ्या दोन दिवसांत यासंबंधीचे घटनादुरुस्ती विधेयक लोकसभा आणि राज्यसभेत मंजूर करून घेतले होते.