Desh

महात्मा गांधी यांचा सर्वात उंच पुतळा भाजपाला का बांधता आला नाही? – शशी थरुर

By PCB Author

November 01, 2018

नवी दिल्ली, दि.१ (पीसीबी) – सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकार्पण केल्यानंतर काँग्रेस नेते आणि खासदार शशी थरुर यांनी सरकारवर निशाणा साधला आहे. सरदार पटेल हे महात्मा गांधींचे शिष्य होते. शिष्याचे स्मारक झाले. मग भाजपाला सरदार पटेल यांचे गुरु असलेल्या महात्मा गांधी यांचा सर्वात उंच पुतळा का बांधता आला नाही, असा सवाल त्यांनी मोदी सरकारला विचारला आहे.

महात्मा गांधी यांचा सर्वात मोठा पुतळा सध्या संसद परिसरात आहे. पण त्यांचे शिष्य असलेल्या सरदार पटेल यांच्या पुतळ्याची उंची १८२ मीटर इतकी आहे. मग त्यांचे गुरु असलेल्या महात्मा गांधींचे त्यापेक्षा उंच स्मारक भाजपाला का बांधता आले नाही?. याचे उत्तर कदाचित भाजपाकडेही नसेल, असे त्यांनी सांगितले.

भाजपा नेते महात्मा गांधींच्या विचारधारेचे अनुकरण करत नाही आणि त्याचे प्रमुख कारण महात्मा गांधींची अहिंसेची शिकवण आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. स्वातंत्र्य लढ्यात योगदान देणारे नेते भाजपाकडे नसल्याने त्यांना सरदार पटेलांसारख्या काँग्रेस नेत्यांचा आधार घ्यावा लागला, अशी टीका त्यांनी केली.