महात्मा गांधीजींचा मृत्यू अपघातामुळे , ओडिशा सरकारचे पुस्तक वादात

598

नवी दिल्ली,दि.१६(पीसीबी) – राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या मृत्यूवरुन ओडिशामध्ये सध्या चांगलेच राजकीय वातावरण तापले असल्याचे पहायला मिळत आहे. महात्मा गांधींचा मृत्यू अपघातामुळे झाला असल्याचा दावा ओडिशा राज्य सरकारच्या पुस्तिकेमध्ये करण्यात आला आहे. त्यामुळे ओडिशामध्ये राजकारण पेटले आहे. यामुळे ओडिशातील सर्व विरोधी पक्षाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री नवीन पटनायकांनी माफी मागावी आणि ही चूक त्वरित दुरुस्त करावी अशी मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

हे पुस्तक महात्मा गांधी यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त प्रकाशित करण्यात आले आहे. ‘आमा बापूजी: एक झलक’ या पुस्तिकेमध्ये गांधीजींची शिकवण, त्यांचे कार्य आणि ओडिशाशी असलेले त्यांचे नाते यांचा संक्षिप्त आढावा दिला आहे. या पुस्तिकेत असा दावा केला गेला आहे की, 30 जानेवारी 1948 रोजी दिल्लीतील बिर्ला हाऊस येथे अचानक झालेल्या एका घटनाक्रमात गांधीजींचा मृत्यू झाला.

त्यामुळे ओडिशामध्ये राजकारण तापले आहे. याप्रकरणावरुन झालेल्या गोंधळानंतर शाळा आणि सार्वजनिक शिक्षण विभागाने अशी माहिती कशी प्रकाशित केली आहे याचा तपास करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले आहेत. ही पुस्तिका सरकारी शाळा आणि राज्य सरकारच्या अनुदानित शाळांमध्ये वितरणासाठी प्रकाशित करण्यात आले होते. कॉंग्रेस नेता नरसिंह मिश्रा यांनी सांगितले की, सरकार प्रमुख या नात्याने मुख्यमंत्र्यानी पुस्तिकेत प्रकाशित केलेल्या चुकीच्या माहितीबाबत माफी मागितली पाहिजे. तसंच ताबडतोब पुस्तिकेतील मजकूर काढून टाकावा, असे त्यांनी सांगितले. या प्रकरणावरुन विधानसभेमध्ये जोरदार गोंधळ झाला.