महाआघाडीसाठी चार पावले मागे येण्यास तयार – अखिलेश यादव

0
488

लखनऊ, दि. (पीसीबी) –  २०१९ च्या लोकसभा निवडणुकांपूर्वी उत्तर प्रदेशात महाआघाडीची चर्चा सुरु झाली आहे. उत्तर प्रदेशेचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी महाआघाडीसाठी सकारात्मक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या महाआघाडीत सपा, बसपा, काँग्रेस आणि आरएलडी असतील, असे चार पक्ष असण्याची शक्यता असून, हे चार पक्ष मिळून उत्तर प्रदेशात भाजपला टक्कर देण्याची शक्यता आहे.

खरंतर गेल्या अनेक दिवसांपासून महाआघाडीतील पक्षांची चर्चा जागावाटपावरुनच फिस्कटते आहे, असे बोलले जाते होते. आता मात्र मायावतींनी या चर्चेला दुजोरा दिला आहे. बहुजन समाज पक्षाच्या अध्यक्षा आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती यांनी रविवारी म्हटले की, महाआघाडी तेव्हाच बनेल, जेव्हा बसपाला सन्मानपूर्वक जागा दिल्या जातील.

समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मात्र महाआघाडी होण्याच्या दृष्टीने सकारात्मक विधान केले आहे. ते म्हणाले, महाआघाडीच उत्तर प्रदेशात भाजपला रोखू शकते. त्यामुळे भले आम्हाला दोन-चार पावले मागे यावे लागले तरी चालेल.

अखिलेश पुढे म्हणाले, “काँग्रेसनेही मोठे मन दाखवावे, असे आम्ही आवाहन करतो. कारण काँग्रेस राष्ट्रीय पक्ष आहे. पंतप्रधानपदासाठी उमेदवाराचा मुद्दा सध्या नाही. निवडणुकांचे निकाल आल्यानंतर ते ठरवले जाईल. या निवडणुकीत प्रादेशिक पक्षांची भूमिका मोठी असेल. तेच भाजपचा सामना करु शकतील.”