Maharashtra

महाआघाडीने नाकारले; कृष्णकुंजवर मनसेची पर्यायांवर खलबते

By PCB Author

February 11, 2019

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – लोकसभा निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी कृष्णकुंजवर आज (सोमवार) प्रमुख नेत्यांची बैठक बोलावली. राष्ट्रवादी काँग्रेस अध्यक्ष शरद पवार यांनी निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही, असे सांगून मनसेला महाआघाडीमध्ये स्थान नसल्याचे स्पष्ट केले होते.  त्यानंतर दुसऱ्या पर्यायांवर या बैठकीत विचार करण्यात येत असल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेस  आणि मनसे  यांच्यात जवळीक वाढत असतानाच शरद पवारांनी मात्र निवडणुकीपर्यंत राज ठाकरे आमच्यासोबत रहातील असे वाटत नाही, असे विधान केले  होते. त्यामुळे महाआघाडीमध्ये मनसेला स्थान नसल्याचे स्पष्ट झाले होते. तसेच मनसे आणि राष्ट्रवादी एकत्र येण्याच्या चर्चेवर पडदा पडला होता.

आगामी लोकसभा निवडणुकीत मनसेला सोबत घेण्याचा प्रश्नच येत नाही, असे राष्ट्रवादीचे नेते सचिन अहिर यांनीही स्पष्ट केले होते.  मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यात आघाडी होणार नाही, असा दावाच अहिर यांनी केला आहे. त्यामुळेच मुंबईतील कोणतीही जागा मनसेसाठी सोडण्याचा प्रश्नच येत नाही, असेही अहिर यांनी म्हटले होते.