Maharashtra

महाआघाडीत डॉ. प्रकाश आंबेडकरांना घेण्यास राष्ट्रवादी तयार – सुनिल तटकरे  

By PCB Author

November 18, 2018

पंढरपूर, दि. १८ (पीसीबी) –  आगामी लोकसभा  आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप विरोधात सर्व मित्र पक्षांनी केलेल्या महाआघाडीत भारीप बहुजन पक्षाचे अध्यक्ष डॉ. प्रकाश आंबेडकर यांना  सहभागी करुन घेण्यास राष्ट्रवादी काँग्रेस तयार आहे,  असे राष्ट्रवादीचे  राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी आज (रविवार)  येथे सांगितले.

कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने  तटकरे यांनी  आज दुपारी  विठ्ठलाचे  दर्शन घेतले.  त्यानंतर ते  पत्रकारांशी  बोलताना म्हणाले की,  आगामी निवडणुकीसाठी  महाआघाडीच्या माध्यमातून समविचार पक्षांना एकत्रित केले जात आहे. भाजपविरोधात एक सक्षम असा पर्याय देण्याचा विचार आहे.  महाआघाडीमध्ये  सर्व नाराज आणि मित्रपक्षांना  सहभागी करून घेतले जाणार आहे. याबाबत एक बैठक पार पडली आहे. डॉ. आंबेडकर यांच्याशी बैठक घेवून त्यांचेही मतपरिवर्तन करण्याचा   प्रयत्न केला जाणार असल्याचे तटकरे यांनी यावेळी सांगितले.

शिवसेनेने राजकारणात दुटप्पी भूमिका घेण्याचा कळस गाठला आहे, अशी टीका करून तटकरे म्हणाले की,  मराठा समाजाला आऱक्षण देण्यातबाबतची भूमिका राष्ट्रवादीने सुरवातीपासूनच  घेतली आहे. परंतू, आरक्षण देताना ओबीसीच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठ्यांना आरक्षण द्यावे, असे ते यावेळी म्हणाले.