Desh

महाआघाडीत खोडा; उत्तर प्रदेशात काँग्रेसला वगळून बसपा-सपा आघाडी    

By PCB Author

December 19, 2018

नवी दिल्ली, १९ (पीसीबी) – उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला वगळून बहुजन समाज पक्ष आणि  समाजवादी पक्ष यांची आघाडी होण्याबाबत हालचाली सुरू आहेत. बसपाच्या अध्यक्षा मायावती आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांच्यामध्ये जागावाटपाबाबत चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे   आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी भाजपाविरोधात महाआघाडी  करण्याच्या प्रयत्नांना खोडा बसण्याची शक्यता आहे.  

अजित सिंग यांच्या राष्ट्रीय लोकशाही दलालाही या आघाडीत सोबत घेण्यात येणार आहे. लोकसभा निवडणुकीत बसप ३८, समाजवादी पक्ष ३७, तर रालोद ३ अशा ७८ जागांवर निवडणूक लढवणार आहे. तर रायबरेली आणि अमेठीतून या आघाडीचा उमेदवार देणार नसल्याची माहिती आहे. उत्तर प्रदेशात लोकसभेच्या ८० जागा आहेत.

रायबरेली हा गांधी घराण्याचा बालेकिल्ला मानला जातो. काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी रायबरेली मतदारसंघातून सलग चौथ्यांदा खासदार म्हणून निवडणून आल्या आहेत. तर अमेठीतून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व करत आहेत. या आघाडीत हे दोन मतदारसंघ वगळता सर्व जागांवर उमेदवार दिले जाणार आहेत.

दरम्यान, मायावती आणि अखिलेश यांना अद्यापही काँग्रेसविषयी अढी आहे. पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेस, सप आणि बसप स्वतंत्रपणे निवडणुकीला सामोरे गेले होते. मात्र काँग्रेसला ३ राज्यात मिळालेल्या विजयानंतर मायावतींनी त्यांना राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगडमध्ये पाठिंबा दिला. तर अखिलेश यांनी मध्य प्रदेशात पाठिंबा दिला आहे.