Videsh

मसूद अझहरला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्याबाबत चीनला अल्टिमेटम

By PCB Author

April 12, 2019

बिजींग, दि. १२ (पीसीबी) – पाकिस्तानात वास्तव्यात असलेला जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अझहर याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषित करण्यासाठी ब्रिटन-फ्रान्सकडून चीनवर दबाव वाढवण्यात आला आहे. मसूदप्रकरणी मांडण्यात आलेल्या प्रस्तावाला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेतील सर्व सदस्य देशांचा पाठींबा आहे. केवळ चीनच आपल्या वीटो या विशेषाधिकाराचा वापर करीत यात अडथळा आणत आहे.

चीनने तांत्रिक बाबींद्वारे या प्रक्रियेत बाधा आणू नये असे ब्रिटन-फ्रान्सने चीनला सांगितले आहे. युएनएससीच्या १२६७ प्रतिबंध समिती येत्या काही दिवसांत पुन्हा एकदा परिषदेत मसूदला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करण्यासाठी नव्याने प्रस्ताव आणण्याची शक्यता आहे. दरम्यान, २३ एप्रिलपर्यंत यावर सकारात्मक भुमिका घ्यावी, असा अल्टिमेटमही चीनला देण्यात आला आहे.

मसूद अझहरवर आंतरराष्ट्रीय स्तरावर बंदी घालण्यात यावी यासाठी विचार करुन सहमती दर्शवण्यासाठी पुन्हा चर्चा सुरु झाली आहे. यासाठी चीनला २३ एप्रिलपर्यंतचा अल्टिमेटम देण्यात आल्याचे वृत्त माध्यमांनी दिले आहे. चीनने या प्रस्तावावर थेट परिषदेतच पाठींबा द्यावा यासाठी हा कालावधी देण्यात आला आहे कारण १२६७ समितीकडून मसूदच्या बंदीचा प्रस्ताव आणण्याची गरजच पडू नये.

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत हा प्रस्ताव अनौपचारिकरित्या १५ देशांकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, अद्याप यावर औपचारिकरित्या कोणतीही चर्चा सुरु झालेली नाही. दरम्यान, सर्वांचे लक्ष चीनच्या भुमिकेकडे लागले आहे. सर्वांना आशा आहे की, चीन आपल्या भुमिकेत बदल करेल. मात्र, चीन अद्यापही मसूदबाबत आपली भुमिकेबाबत कायम आहे. मसूदच्या प्रवासावर बंदी घालण्यासाठी आणि त्याची संपत्ती जप्त करण्यासाठी त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी घोषीत करणे गरजेचे आहे.