Videsh

मसूद अजहरच्या भावासह ४० जणांना अटक; आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानची कारवाई   

By PCB Author

March 05, 2019

इस्लामाबाद, दि. ५ (पीसीबी) – जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या मसूद अजहर याच्या भावासह ४० जणांना पाकिस्तानने अटक केली आहे. बंदी असलेल्या दहशतवादी संघटनांवर पाकने कारवाई करण्यास सुरूवात केली आहे. वाढत्या आंतरराष्ट्रीय समुदायाच्या दबावामुळे पाकिस्तानने हे पाऊल उचलले आहे.  

पाकिस्तानचे मंत्री शहरयार खान यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की,  मुफ्ती अब्दुर रौफ असे मसूदच्या भावाचे नाव आहे. मुफ्ती अब्दुर रौफ, हम्माद अजहर यांच्यासह ४० जणांना अटक केली आहे. भारताकडून सोपवण्यात आलेल्या पुराव्यांमध्ये (डॉजिअर) मुफ्ती अब्दुर रौफ आणि हम्माद अजहर यांची नावे देखील होती. मात्र ही कारवाई पाकिस्तानने कोणत्याही दबावाखाली केलेली नाही. अशा सर्व दहशतवादी संघटनांवर कारवाई केली जाईल, असे ते म्हणाले.

दरम्यान, पाकिस्तानने नुकतीच एका कायद्यात सुधारणा केली आहे. त्यानुसार आता संयुक्त राष्ट्रांद्वारे दिलेल्या यादीतील दहशतवादी आणि प्रतिबंधित दहशतवादी संघटनांविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे.