Maharashtra

“मशाली पेटवून झुंडीनं रस्त्यावर उतरणं हा बेजबाबदारपणाचा कळस झाला”

By PCB Author

April 07, 2020

मुंबई,दि.७(पीसीबी) – देशाच्या पंतप्रधानांनी दारात, खिडकीत दिवे लावायला सांगितलं असतानाही लोकांनी रस्त्यावर येत अशी कृत्य करणं म्हणजे बेजबाबदारपणाचा कळस असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचा अंधकार दूर करण्यासाठी पाच एप्रिलला रविवारी रात्री नऊ वाजता घराच्या बाहेर येऊन दिवा, मेणबत्ती अथवा टॉर्चचा प्रकाश करण्याचं आवाहन केलं होतं. मात्र काही अतिउत्साही लोकांनी मशाली पेटवून, फटाके फोडून रस्त्यावर गर्दी केली.

सोशल डिस्टन्स पाळण्याचंही आवाहन मोदी यांनी केलं होतं. मात्र काही अतिउत्साही लोकांनी रस्त्यावर येत फटाके फोडले, तर काहींनी मशाल हाती घेत लहान मुलांसह रस्त्यावर फेरी मारल्याचाही व्हिडीओ व्हायरल होत आहेत. यावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी टीका केली आहे.