Maharashtra

मल्टिप्लेक्समध्ये स्नॅक्स ५० रुपयांतच मिळणार, न्यायालयात दावा न टिकल्याने राज दरबारी धाव

By PCB Author

July 08, 2018

मुंबई, दि. ८ (पीसीबी) – मल्टिप्लेक्समध्ये आता चहा-कॉफी, वडा-समोसा व पॉपकॉर्नचे दर ५० रुपयांपर्यंत कमी करण्यात येतील. लहान मुलांचे अन्न, मधुमेही व हृदयरोगी यांना बाहेरील अन्नपदार्थ आणण्याची परवानगी दिली जाणार असून तक्रार कुठे नोंदवायची याची माहितीही सिनेगृहात दिली जाईल. मल्टिप्लेक्समधील खाद्यपदार्थांच्या दरावरून मनसेच्या आंदोलनामुळे मल्टिप्लेक्स चालकांनी शनिवारी राज ठाकरे यांची भेट घेऊन त्यांना ही हमी दिली.

पाच रुपयांचे पॉपकॉर्न २५० रुपयांना का विकता, असा हायकोर्टाने प्रश्न केल्यानंतर मनसेने मल्टिप्लेक्सविरुद्ध राज्यभर आंदोलन सुरू केले होते. त्याविरुद्ध कोर्टाने दावा दाखल करून घेण्यास नकार दिल्याने अखेर मल्टिप्लेक्स चालकांना राजदरबारी धाव घ्यावी लागली. सर्व मल्टिप्लेक्स सीईओंनी राज यांची भेट घेतली. चहा-कॉफी, वडा, समोसा, पॉपकॉर्नचे दर ५० रुपयांपर्यंत कमी करावेत. चहा, कॉफी, पाणी बॉटल, समोसा, पॉपकॉर्न व वडा यांचे दर माफक असावेत. बाकीचे पदार्थ किती किमतीला विकावेत यावर आक्षेप नाही. लहान मुलांचे अन्न, मधुमेही व हृदयरोगींना बाहेरील अन्नपदार्थ आणण्याची परवानगी मिळावी, या मनसेच्या मागण्या मल्टिप्लेक्स व्यवस्थापनाने मान्य केल्या आहेत.