‘मला सरकार पाडण्यासाठी १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर आली होती’; काँग्रेस आमदाराचा धक्कादायक खुलासा

0
377

नवी दिल्ली, दि.२६ (पीसीबी) : मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्याचा कट तिघांनी रचला होता, अशी माहिती मिळाल्यानंतर झारखंडच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. झारखंड पोलिसांच्या विशेष शाखेनं कारवाई करत रांचीतील एका हॉटेलमध्ये धाड टाकत तीन जणांना अटक केली. हे तिघे सरकारमधील बाराहून अधिक आमदारांच्या संपर्कात होते अशी माहितीही समोर आली आहे. तिघांच्या अटकेनंतर काँग्रेसच्या आमदाराने मोठा गौप्यस्फोट केला आहे. हेमंत सोरेन यांचं सरकार पाडण्यासाठी आपल्याला १ कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर देण्यात आली होती, असा दावा काँग्रेसच्या आमदाराने केला आहे.

आमदारांचा घोडेबाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या तिघांना अटक करण्यात आल्यानंतर काँग्रेसचे आमदार नमन बिक्सल कोंगारी यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. कोलेबिरा मतदारसंघाचे आमदार असलेल्या कोंगारी यांनी आपल्यालाही सरकार पाडण्यासाठी मोठी ऑफर देण्यात आली होती, असा दावा इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना केला आहे. झारखंडमध्ये झारखंड मुक्ती मोर्चा, काँग्रेस आणि राजद या तिन्ही पक्षांचं सरकार आहे. सरकार पाडण्याविषयी देण्यात आलेल्या ऑफरबद्दल बोलताना काँग्रेसचे आमदार कोंगारी म्हणाले, “हे तिन्ही लोक माझ्यापर्यंत पक्षाचे कार्यकर्ते म्हणून पोहोचले होते. काही कंपन्यांसाठी काम करत असल्याचं त्यांनी सांगितलं होतं. मी त्यांच्यापासून दूर जाण्याचा प्रयत्न केले, पण ते पुन्हा वेगवेगळ्या मार्गाने संपर्कात यायचे. एकदा तर त्यांनी मला रोख १ कोटींची ऑफर दिली. ही ऑफर आल्यानंतर मी लागलीच हे सगळं पक्षाचे नेते आलमगीर आलम आणि पक्षाचे प्रभारी आरपीएन सिंह यांच्या कानावर घातलं. याबद्दल मी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनाही माहिती दिली होती”.