`मला मारण्यासाठी दोन कोटींची सुपारी` – खासदार संजय जाधव यांची तक्रार

0
787

परभणी, दि. २८ (पीसीबी) : परभणी लोकसभा मतदारसंघाचे शिवसेना खासदार संजय जाधव यांनी जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली आहे. रात्री उशिरा स्वत: नानलपेठ पोलीस स्टेशनमध्ये या प्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली आहे. दरम्यान याप्रकरणी अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. “मला मारण्यासाठी परभणीतून दोन कोटी रुपयांची सुपारी देण्यात आली आहे. नांदेडमधील एका मोठ्या टोळीने हा कट रचल्याची शक्यता खासदार संजय जाधव यांनी तक्रार अर्जात केली आहे. याप्रकरणी रात्री उशिरा त्यांनी तक्रार दाखल केली.

“मला जीवे मारण्याची सुपारी देणारा व्यक्ती हा परभणीतील असावा” असा आरोप खासदार संजय जाधव यांनी केला आहे. माझ्या एका विश्वासू व्यक्तीने मला ही माहिती दिली आहे, असेही संजय जाधव यांनी पोलिसात तक्रार करताना सांगितले.
या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता नानलपेठ पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आहे. मात्र अद्याप याप्रकरणी कोणताही गुन्हा दाखल करण्यात आला नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक कुंदनकुमार वाघमारे यांनी दिली आहे. दरम्यान खासदारांच्या जीवावर उठलेला हा व्यक्ती नेमका कोण? असा सवाल या निमित्ताने उपस्थित होऊ लागला आहे.