मला भावी मुख्यमंत्री म्हणू नका; अजित पवारांचे कार्यकर्त्यांना आवाहन

0
719

बारामती, दि. १६ (पीसीबी) – पदांच्या  लालसेमुळे कार्यकर्त्यांमध्ये आणि पदाधिकारी यांच्यामध्ये पाडापाडीचे राजकारण सुरु होते. या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांनी बोलताना आपल्याला भावी मुख्यमंत्री आणि शरद पवार यांना भावी पंतप्रधान म्हणू नये, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना आज (रविवार) येथे केले.  

बारामती येथे आयोजित एका कार्यक्रमात  अजित पवार बोलत होते. यावेळी एका स्थानिक नेत्याने आपल्या भाषणात अजित पवार यांचा उल्लेख भावी मुख्यमंत्री असा केला. हाच धागा पकडत अजित पवार यांनी कार्यकर्त्यांना असा उल्लेख न करण्याची विनंती केली.

आगामी निवडणुकीत राष्ट्रवादी आणि काँग्रेस आघाडीचे जास्तीत जास्त उमेदवार कसे निवडून येतील  याकडे कार्यकर्त्यांनी लक्ष दिले पाहिजे. भावी मुख्यमंत्री आणि भावी पंतप्रधान असे म्हटल्यामुळे मित्र पक्षातील कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण होतो. त्यांच्या भावना दुखावू शकतात किंवा कोणाला पसंत पडत नाही. आणि त्यातून पाडापाडी होऊ शकते. त्यामुळे आघाडीला बहुमत कसे मिळेल, याकडे अगोदर लक्ष द्यावे, असे आवाहन  अजित पवार यांनी केले.

पदांच्या उल्लेखामुळेच पाडापाडीचे राजकारण होते आणि या पाडापाडीमुळेच आमची माती झाली आहे, असे  म्हणताच उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.  वृत्तवाहिन्यांच्या कॅमेऱ्याकडे पाहत ते म्हणाले, अजित पवार काय बोलतात यावरच लक्ष असते, यांचं..अटेंशन.. ब्रेकिंग न्यूज.. असे त्यांनी म्हणताच उपस्थितांनी त्यांना हसून दाद दिली.