मला पैसे दिले नाही तर जीवाशी जाल; असे म्हणत तहसीलदार व पोलीस अधिकाऱ्याने मागितली एक कोटी रुपयांची खंडणी

0
855

पिंपरी,दि. १ (पीसीबी) : मला तुमच्या व्यवहारात काही देणेघेणे नाही. मला एक कोटी पाहिजेत. जर दिले नाहीत तर गाठ माझ्याशी आहे’ असे म्हणत तहसीलदार आणि पोलीस अधिकारी असल्याचे सांगत खंडणी मागितली. हा प्रकार रावेत येथील एका हॉटेलवर गुरुवारी (दि. 30) घडला.

याप्रकरणी अतिश मोहन भालसिंग (वय 32, रा. गहुंजे, पुणे) यांनी पोलीस आयुक्तांकडे तक्रार अर्ज दिला आहे.

भालसिंग यांनी दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे कि, अतिश भालसिंग यांनी पेठ शहापूर येथे गट क्रमांक 186 हा मेहता आणि कालेकर यांच्याकडून विकत घेतला. त्याची परवानगी घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दिला आहे. 30 सप्टेंबर रोजी कालेकर यांचा मुलगा अॅड. सुशांत कालेकर हे भालसिंग यांना भेटण्यासाठी रावेत येथील एका हॉटेलवर आले. बोलणी सुरु असताना या व्यवहारातील एजंट रमेश दिघे तिथे आले. त्यांच्यासोबत अन्य काही लोक होते.

त्यातील एकाने त्याचे नाव उत्तम वामन पवार असून तो तहसीलदार असल्याचे सांगितले. तसेच त्याच्या सोबत एकजण पोलीस गणवेशात होता. तो फरासखाना येथे कार्यरत असल्याचे सांगितले. तो भालसिंग यांच्या टेबलवर बसला आणि त्याने अरेरावी केली. ‘मला तुमच्या व्यवहारात काही घेणेदेणे नाही. मला शेतक-यांच्या पैशांव्यतिरिक्त एक कोटी पाहिजेत. जर दिले नाही तर गाठ माझ्याशी आहे. माझी सगळीकडे ओळख आहे. मला पैसे दिले नाही तर जीवाशी जाल’.

‘यातील एक गोष्ट कोणाला सांगितली तर गाठ माझ्याशी आहे. मला पैसे पंधरा दिवसात पाहिजेत. नाहीतर माझ्यासारखा वाईट कोणीच नाही’, असे भालसिंग यांना धमकावले. त्यातील एकाने तो नायब तहसीलदार असल्याचे कार्ड दाखवले तर दुस-याने फरासखाना पोलीस ठाण्यात कार्यरत असल्याचे सांगितले. भालसिंग यांना दोघांचा संशय वाटल्याने त्यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश आणि रावेत पोलिसांकडे तक्रार अर्ज दिला आहे.