“मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही, पण…”

0
489

मुंबई,दि.२१(पीसीबी) – “मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही, पण तरीही मुंबईच्या काही भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हा प्रयोग करुन पाहणार आहोत”, असे आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेवर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

आयपीएस अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते.

“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला, शहराला विशिष्ट असा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाईट लाईफ’ सुरु करता येणार नाही. मुंबईतील काही भागांमध्येच नाईट लाईफ सुरु करण्यात येत असून ते फक्त प्रायोगिक तत्वावर असणार आहे. खरंतर मला नाईट लाईफ हा शब्दच आवडत नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. याशिवाय “सुरुवातीला हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल यांना २४ तासांचा परवाना मिळणार आहे”, असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान,येत्या २६ जानेवारीपासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर २४ तास खुले राहणार आहेत. हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.