Maharashtra

सत्तेसाठी कधीच लाचार होणार नाही – उद्धव ठाकरे

By PCB Author

October 21, 2018

अहमदनगर, दि. २१ (पीसीबी) – मला खुर्ची नको,केवळ जनतेचे प्रेम हवे आहे. सत्तेत राहून जर त्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामे करुन घेत आहे. तर आणखी काय पाहिजे. सत्तेसाठी मी कधीच लाचार होणार नाही, लाचारी माझ्या वडिलांनी कधी शिकवलीच नाही, असे  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी म्हटले.

आज (रविवारी) शिर्डीत कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते.

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान शिर्डीत येऊन २०१९ला आम्हीच सत्तेत येणार असल्याचे सांगून गेले. येथील लोकांशी त्यांनी मराठीत संवाद साधला आणि कसं काय आहे विचारले. मात्र, राज्यातील दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर असे विचारणे ही लोकांची थट्टा आहे. साईबाबांचा आशिर्वाद सर्वांनाच आहे. त्यामुळे आपणही स्वबळावर सत्तेत येण्यास आशावादी आहे, असे ते म्हणाले.

शिवसेना सत्तेतून बाहेर पडल्याने भाजपला काहीही फरक पडणार नाही. मात्र, सत्तेत असलो तरी सत्ताधाऱ्यांच्या डोक्यावर बसून तुमची कामे करुन घेऊ शकतो. केवळ सत्ता आहे म्हणून शेपूट हालवणारा मी नाही. तर हातातला चाबूक ओढणारा आहे. सध्या खोटे बोल पण रेटून बोल, अशी राजकीय स्थिती आहे. खाटे बोलून सत्तेत आलेले देशद्रोही आहेत, अशी तोफ त्यांनी यावेळी भाजपवर डागली.