Maharashtra

“मला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाली होती”; नितीन गडकरींचा खुलासा

By PCB Author

September 14, 2021

मुंबई, दि.१४ (पीसीबी) : केंद्रीय वाहतूक मंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते नितीन गडकरी यांना एकदा काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर देण्यात आली होती. राजस्थान विधानसभेत आयोजित एका परिसंवादात नितीन गडकरी यांनी हजेरी लावली. यावेळी बोलताना त्यांनी मुख्यमंत्रीपदावरुन इतरांसह आपल्या पक्षालाही चिमटे काढत जोरदार टोलेबाजी केली. नेते, मंत्री आणि मुख्यमंत्री सगळेच दु:खी असतात असं यावेळी नितीन गडकरींनी म्हटलं. 

Addressing Seminar on ‘Parliamentary System and People's Expectations’, Rajasthan Legislative Assembly, Jaipur https://t.co/3jYy0ghy4C

— Nitin Gadkari (@nitin_gadkari) September 13, 2021

नितीन गडकरी यांनी यावेळी आपल्याला काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची ऑफर मिळाली होती असा खुलासा केला. “नागपूरमधील काँग्रेसचे नेते डॉक्टर श्रीकांत माझे चांगले मित्र आहेत. त्यांनी १७ हून अधिक विषयांमध्ये पीजी केली आहे. त्यावेळी जेव्हा मी निवडणूक हारलो होतो तेव्हा भाजपाची स्थिती आज आहे तशी नव्हती. त्यावेळी त्यांनी मला नितीन तू चांगला आहेस, पण तुझ्या पक्षाचं भवितव्य नाही.. तू काँग्रेसमध्ये ये असं सांगितलं होतं. त्यावेळी मी नम्रपणे नकार दिला होता. चढ-उतार येत असतात, पण आपण आपल्या विचारधारेशी निष्ठा राखली पाहिजे,” असं यावेळी त्यांनी सांगितलं.

“समस्या सर्वांसोबत आहे, प्रत्येकजण दु:खी आहे. आमदार मंत्री होऊ शकले नाहीत म्हणून दु:खी आहेत. मंत्री झाले तर चांगलं खात मिळालं नाही म्हणून दु:खी आहेत. ज्या मंत्र्यांना चांगलं खातं मिळालं ते मुख्यमंत्री होऊ शकलो नाही म्हणून दु:खी आहेत. आणि मुख्यमंत्री दु:खी आहेत कारण कधीपर्यंत पदावर राहू हे माहिती नाही,” असं नितीन गडकरींनी यावेळी म्हटलं. पुढे ते म्हणाले की, “मला एका पत्रकाराने तुम्ही इतक्या मजेत कसे राहू शकता असं विचारलं होतं. मी सांगितलं, मी भविष्याची चिंता करत नाही. जो भविष्याची चिंता करत नाही तो आनंदी राहतो. एकदिवसीय क्रिकेटप्रमाणे खेळत राहा. मी सचिन तेंडूलकर आणि सुनील गावसकर यांना लांब षटकार मारण्याचं रहस्य विचारलं होतं तेव्हा त्यांनी हा कौशल्याचा भाग असल्याचं सांगितलं होतं. त्याचप्रमाणे राजकारणदेखील कौशल्य आहे”.

गडकरींना यावेळी सांगितलं की, “अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निक्सन यांना वॉटरगेट प्रकरणानंतर पद सोडावं लागलं होतं. राष्ट्राध्यक्ष पदावरुन दूर झाल्यानंतर त्यांना लोकांना कॉलनीत राहण्यासाठी घर दिलं नव्हतं. निक्सन यांनी व्यक्ती पराभव झाल्याने नव्हे तर लढा न दिल्याने संपते असं लिहिलं होतं. आपल्याला आयुष्यात लढायचं आहे. कधी कधी आपण सत्तेत असतो, तर कधी विरोधी पक्षात असतो. हे सुरुच असतं. जे जास्त वेळ विरोधी पक्षात असता ते सत्तेत येऊनही विरोधी पक्षाप्रमाणे वागतात. आणि जे जास्त काळ सत्तेत राहणारे विरोधी पक्षात जाऊनही सत्ते असल्याप्रमाणे वागतात. त्यांना सवय लागलेली असते”.