Maharashtra

मला उचलून आपटण्यासाठी तनुश्रीने पैसे दिले- राखी सावंत

By PCB Author

November 13, 2018

मुंबई, दि. १३ (पीसीबी) – राखी सावंत आणि तनुश्री दत्ता हा वाद आता सर्वांनाच परिचयाचा झाला आहे. मीटु मोहिमेपासून सुरू झालेला हा वाद आजतागायत कायम आहे. आता तिने तनुश्रीवर आणखी एक आरोप केला आहे. नुकतेच एका स्पर्धेदरम्यान महिला कुस्तीपटूने राखीला उचलून आदळले. त्यामुळे दुखापत झालेल्या राखीला रुग्णालय गाठावे लागले. मात्र याला केवळ आणि केवळ तनुश्री दत्ताच कारणीभूत असून तिनेच कुस्तीपटूला मला मारण्याची सुपारी दिली असा दावा राखीने केला आहे.

हरियाणातील पंचकुला येथे कॉन्टिनेंटल रेसलिंग इंटरनॅशनल (सीडब्ल्यूई) बॅनरखाली रेसलिंगच्या बिग फाईटचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय महिला कुस्तीपटूंनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेत राखीने विजयी महिला कुस्तीपटूला आव्हान देत तिच्याशी दोन हात करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे चिडलेल्या रैवलननं राखीला हवेत उचलून जमीनीवर आदळले.

या घटनेनंतर राखीने रुग्णालयात धाव घेतली. ती पूर्णपणे बरी असल्याचे डॉक्टरांचे जरी म्हणणे असले तरी राखीने मात्र आपल्यावर ही परिस्थिती तनुश्रीमुळे ओढावली असल्याचा दावा केला आहे. मी कुस्तीपटूला आव्हान दिले नाही, मी डान्स करत होते तेव्हा तिने मला उचलून आदळले यामागे तनुश्रीचा हात आहे, यासाठी तनुश्रीने कुस्तीपटूला भरपूर पैसे दिले होते असे राखीचे म्हणणे आहे.