Maharashtra

मला आणि प्रणितीला भाजपप्रवेशाच्या ऑफर; सुशीलकुमार शिंदेंचा दावा

By PCB Author

March 26, 2019

सोलापूर, दि. २६ (पीसीबी) – काँग्रेसचे माजी खासदार सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्याला भाजपमधून ऑफर होती, असा खळबळजनक दावा केला आहे. पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे आपण भाजपप्रवेशाची ऑफर धुडकावून लावल्याचे सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले.

भाजपच्या एका बड्या नेत्याची ऑफर होती. भाजपचा संबंधित नेता माझ्या तोडीचा होता, असे सांगतानाच सुशीलकुमार शिंदेंनी त्यांचे नाव घेणे मात्र टाळले. आपण पक्षाशी एकनिष्ठ असल्यामुळे भाजपमध्ये प्रवेश करण्याची ऑफर फेटाळून लावली, असsही सुशीलकुमार शिंदेंनी सांगितले.

सुशीलकुमार शिंदे यांची कन्या प्रणिती शिंदे या सोलापुरातून काँग्रेस आमदार आहेत. प्रणिती यांनाही वारंवार भाजपप्रवेशाच्या ऑफर येत असल्याचा दावा सुशीलकुमार शिंदेंनी केला.

दरम्यान, तरुणांना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे, असे म्हणत सुशीलकुमार शिंदे यांनी सुजय विखे-पाटील यांनी पक्षांतर करणे गैर नसल्याचे सांगितले होते.

सुजय विखेंच्या भाजपप्रवेशाबाबत बोलताना सुशीलकुमार म्हणाले होते की, प्रत्येकाला करिअर करायचे असते. तिकीटवरुन नाराजी म्हणून तरुण पक्ष बदलत आहेत. वैचारिक भूमिका आहे पण मुलांना स्वतःचा निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य आहे. मात्र राधाकृष्ण विखे-पाटील काँग्रेसचे प्रामाणिक नेते आहेत. त्यामुळे त्यांनी राजीनामा देण्याची गरज नाही.