मला अश्लील शिवीगाळ होत असताना महिला नेत्या गप्प का? तृप्ती देसाई यांचा संतप्त सवाल

0
740

मुंबई,दि.१५(पीसीबी) – इंदुरीकर महाराज प्रकरणात माझ्यावर जो अश्लील शिवीगाळ होत आहे, धमक्या येत आहेत, शिवसेनेच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून मला मारण्याची भाषा केली जात आहे. तसेच इंदुरीकर महाराजांचे समर्थक माझ्याबद्दल घाणेरडी भाषा वापरत आहेत. याबाबत सुप्रियाताई सुळे, नीलमताई गोरे, यशोमतीताई ठाकूर, चित्राताई वाघ काही जाहीररीत्या बोलणार आहेत का नाही?.. का त्यांना मान्य आहे हे सगळे?, असा संतप्त सवाल तृप्ती देसाई भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्ष यांनी केला आहे.

काही दिवसांपूर्वी ह.भ.प. इंदुरीकर महाराज देशमुख यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वादंग निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर तृप्ती देसाई यांनी इंदुरीकर महाराजांवर कडवट टीका केली होती. या प्रकरणावरुन शिवीगाळ आणि धमक्या येत असल्याचं सांगत देसाई यांनी महिला नेत्यांना सवाल केला आहे.

दरम्यान, आधी संभाजी भिडे आणि आता इंदुरीकर महाराज. स्त्रियांबद्दल असं बेताल वक्तव्य करणाऱ्यांच्या मुसक्या आवळल्या गेल्या पाहिजेत. त्यामुळे इंदुरीकरांवर गुन्हा दाखल झाला नाही तर आम्हाला रस्त्यावर उतरणार असल्याचं म्हणत देसाई यांनी टीका केली होती.