मला अजुन अनेक विक्रम मोडायचे आहेत – प्रदीप नरवाल

0
545

नवी दिल्ली, दि. १३ (पीसीबी) – प्रो-कबड्डीच्या इतिहासात तीन वेळा विजेतेपद पटकावणाऱ्या पाटणा पायरेट्स संघाची यंदाच्या हंगामात फारशी चांगली सुरुवात झालेली नाही. स्पर्धेच्या उत्तरार्धात प्रदीप नरवालच्या खेळीच्या जोरावर पाटण्याने प्ले-ऑफसाठीच्या आशा कायम ठेवल्या आहेत. सध्या पाटण्याचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर आहे. पाटण्याचा प्रदीप नरवाल यंदाच्या हंगामात अनेक विक्रम केले आहेत. चढाईमध्ये १ हजार गुणांचा टप्पा ओलांडणारा प्रदीप पहिला खेळाडू ठरला. यावेळी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत प्रदीपने आपल्यासाठी ही सुरुवात असल्याचे सांगत, आपल्याला अजुन अनेक विक्रम मोडायचे असल्याचे म्हटले आहे.

“ज्या दिवसापासून मी प्रो-कबड्डी खेळायला सुरुवात केली आहे त्यापासून आतापर्यंत माझा प्रवास आश्वासक आहे. मात्र मी यावरच समाधान मानणार नाहीये, मला अजुन अनेक विक्रम मोडायचे आहेत. इथपर्यंत पोहचण्यासाठी मी प्रचंड मेहनत घेतली आहे. त्यामुळे यापुढे हे स्थान टिकवून ठेवण्यासाठी मी यापेक्षा अधिक मेहनत करणार आहे. यंदाच्या हंगामात उरलेल्या सर्व सामन्यांमध्ये सर्वोत्तम कामगिरी करत मी संघाला प्ले-ऑफमध्ये प्रवेश मिळवून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहे.” प्रदीप आपल्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल बोलत होता.

गुरुवारी झालेल्या सामन्यात पाटणा पायरेट्सने जयपूर पिंक पँथर्सची झुंज ३६-३३ अशी मोडून काढली. या सामन्यात प्रदीपने चढाईमध्ये १४ गुणांची कमाई केली. प्रदीपने यंदाच्या हंगामात सर्वाधिक सुपर रेड मारण्याचा विक्रमही केला आहे. (एका चढाईत ३ किंवा त्यापेक्षा अधिक गुण मिळवल्यानंतर सुपर रेड मानली जाते) त्यामुळे उरलेल्या सामन्यांमध्ये प्रदीप आपल्या संघाला प्ले-ऑफचं तिकीट मिळवून देतो का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.