‘मर जवान, मर किसान’ हीच मोदी सरकारची मानसिकता – राष्ट्रवादी काँग्रेसचा घणाघात

0
422

मुंबई, दि. २ (पीसीबी) – दिल्लीत विविध मागण्यांसाठी मोर्चा काढणाऱ्या शेतकऱ्यांवर बळाचा वापर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने मोदी सरकारवर टीका केली आहे. मर जवान, मर किसान हीच मोदी सरकारची मानसिकता असून गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आला, अशी टीका राष्ट्रवादीने केली आहे.

आज (मंगळवारी) दिल्लीच्या वेशीवर धडकलेल्या शेतकऱ्यांच्या मोर्चाला पोलिसांनी रोखले. शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या. या घटनेनंतर काँग्रेसपाठोपाठ राष्ट्रवादी काँग्रेसनेही भाजपावर टीका केली. हा देशाच्या इतिहासातील काळा दिवस असल्याचे सुप्रिया सुळे यांनी सांगितले. तर राष्ट्रवादी प्रवक्ते नवाब मलिक यांनी ट्विटरवरुन प्रतिक्रिया दिली. ते म्हणतात, ‘किसान क्रांती पदयात्रा’ दिल्लीमध्ये अडवण्यात आली. गांधी जयंतीच्या दिवशी अहिंसेचे भान न ठेवता शेतकऱ्यांवर अश्रुधूर आणि लाठीचार्ज केला गेला. त्यामुळे भाजपाचा हिंसक चेहरा समोर आलेला आहे. या घटनेचा आम्ही निषेध करतो. शेतकऱ्यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस खंबीरपणे उभी आहे. मोदी सरकार म्हणत होते ‘मर जवान, मर किसान’ आता त्यांची मानसिकता अधिक प्रखरपणे या घटनेतून स्पष्ट झाली, असे त्यांनी नमूद केले.

विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी देखील ट्विटरवरुन सत्ताधाऱ्यांवर टीका केली. ‘जय जवान, जय किसान’चा नारा देणारे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्रींची जयंती आहे आणि दुर्दैवाने आजचे सरकार मार किसान म्हणत किसान क्रांती पदयात्रेवर पाशवी बळ बळाचा वापर करत आहे. या सरकारचा करावा तेवढा निषेध कमी असल्याचे मुंडेंनी म्हटले आहे. देशातील सरकार हे शेतकरी विरोधी असल्याची टीका अजित पवार यांनी केली आहे.