मराठ्यांना आरक्षण मिळू शकते तर पाटीदारांना का नाही?- हार्दिक पटेल

0
540

नवी दिल्ली, दि. ३० (पीसीबी) – महाराष्ट्र सरकारने मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्यानंतर पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल याने गुजरातमध्ये सत्तेत असणारी भाजपा असाच निर्णय पाटीदार समाजाबद्दल का घेऊ शकत नाही असा प्रश्न उपस्थित केला आहे. कालच महाराष्ट्र सरकारने नोकरी आणि शिक्षणामध्ये मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याची घोषणा केल्यानंतर हार्दिकने हे मत मांडले आहे.

ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील भाजपा सरकारने मराठा समाजाच्या सामाजिक आणि आर्थिक स्थितीचे सर्वेक्षण केले तसेच सर्वेक्षण गुजरातमध्ये पाटीदार समाजाचे व्हावे अशी मागणी हार्दिकने यावेळी केली. ‘गुजरातमध्ये पाटीदारांचे कोणतेही सर्वेक्षण करण्यात आले नाही. असे सर्वेक्षण केले तर  राज्यामध्ये पाटीदार हे सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या मागासलेले असल्याचे सिद्ध होईल’ असे हार्दिकने उत्तर गुजरातमधील पाटण शहरात पत्रकारांशी बोलताना सांगितले. पुढे बोलताना गुजरातमधील भाजप सरकारवर हार्दिकने ताशेरे ओढले. महाराष्ट्रातील भाजपा सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकते तर मग गुजरातमधील सरकार आरक्षण का देऊ शकत नाही? पाटीदारांना आरक्षण लागू करण्यात राज्यातील गुजरात सरकारचा अहंकार आड येत आहे का? असा सवालही हार्दिकने उपस्थित केला आहे.

गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी काम कऱणाऱ्या पाटीदार अनामत आंदोलन समितीने (पीएएएस) मंगळवारी गुजरात इतर मागासवर्गीय वर्ग (ओबीसी) आयोगाच्या सुनाबेन भट यांची गांधीनगरमध्ये भेट घेतली. यावेळी त्यांनी ज्याप्रमाणे महाराष्ट्रातील ओबीसी आयोगाने मराठ्यांच्या आर्थिक आणि समाजिक स्थितीचे सर्वेक्षण केले त्याच प्रमाणे गुजरातमधील पाटीदार समाजाचेही सर्वेक्षण गुजरात ओबीसी आयोगाने करावे अशी मागणी भट यांच्याकडे केली.