Maharashtra

मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवून  मेगा भरती करावी – छगन भुजबळ   

By PCB Author

July 30, 2018

नाशिक, दि.३० (पीसीबी) – राज्यात मेगा भरती करताना  मराठा समाजासाठी १६ टक्के जागा राखीव ठेवून     नोकर भरतीची प्रक्रीया सुरु करण्यात यावी. तसेच या नोकर भरतीचे काम राज्यातील टाटा कन्सलटन्सी सारख्या संस्थांना देण्यात यावे. मध्य प्रदेशात व्यांपम सारखा घोटाळा करणाऱ्या संस्थांना हे काम देण्यात येऊ  नये, अशी सुचना राज्य सरकारला राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी केली आहे.

भुजबळ म्हणाले की, मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देताना एकूण आरक्षण ५० टक्‍क्‍यांहून अधिक होऊ शकते. तर त्यावर तोडगा काढण्यासाठी विरोधी पक्ष सहकार्य करण्यास तयार आहे. या मुद्द्यावर राज्यातील ७२ हजार जागा भरण्यासाठी केली जाणारी नोकर भरतीची प्रक्रिया थांबविणे योग्य होणार नाही. त्याऐवजी मराठा समाजाच्या १६ टक्के जागा राखीव ठेवून नोकर भरती करण्यात यावी.

खुल्या जागांवर देखील या समाजाला संधी मिळण्याची शक्यता आहे. मात्र, त्यासाठी मागासवर्गीय, अनुसुचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय जागांवरील भरती थांबविणे हा त्या घटकावर अन्यायाचे ठरेल. त्यामुळे नोकर भरतीची प्रक्रिया सुरु करण्यात यावी. त्यासाठी राज्यातील टाटा कन्सलटन्सी सर्व्हीसेस सारख्या नामांकित   संस्थांची नियुक्ती करावी. व्यापम सारखा घोटाळा करणाऱ्या संस्थांकडे नोकर भरतीचे काम देऊ नये, असे भुजबळ म्हणाले.