मराठा समाजासाठी सरकारचे मोठे काम, विरोधक धास्तावले – चंद्रकांत पाटील

0
694

नाशिक, दि. १५ (पीसीबी) – मराठा समाजाला  आरक्षण देण्यास राज्य सरकार कटिबध्द असून नोकऱ्या, स्वयंरोजगारासाठी दहा लाखांच्या कर्जाची हमी दिली आहे.  सरकारने मराठा समाजासाठी  केलेल्या मोठ्या  कामामुळे विरोधक घाबरले आहेत. त्यामुळे लोकसभा, विधानसभा निवडणुकीत आमचे काय होईल,  याची धास्ती त्यांना वाटू लागली आहे, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. 

नाशिक येथे मराठा समाजासाठी बांधण्यात आलेल्या पंजाबराव देशमुख वसतिगृहाचे उद्‌घाटन पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.

मराठा समाजाला न्यायालयात टिकणारे आरक्षण आम्ही देणार आहोत. याशिवाय राज्यातील मराठा समाजातील विद्यार्थ्यांना मोफत राहता यावे, यासाठी वसतीगृह बांधण्याचा निर्णय  घेतला आहे. आरक्षणाची चळवळ १९६८ मध्ये सुरू झाली आहे. त्यावेळेपासून  मराठा समाजाकडून आरक्षणाची  मागणी होऊ लागली आहे.

राज्यात १९८० पासून आरक्षणाचा हा लढा तीव्र झाला. अण्णासाहेब पाटील यांनी पहिल्यांदा आरक्षणाच्या मागणीसाठी मोर्चा काढला. या मागणीसाठी आत्महत्या केली. सध्या आरक्षणाचा विषय न्यायालयात आहे.  येत्या १५ नोव्हेंबरला मागासवर्ग आयोगाचा अहवाल राज्य शासनाला प्राप्त होईल, त्यानंतर विशेष अधिवेशन बोलवणार आहोत, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.