Maharashtra

मराठा समाजासाठी राष्ट्रवादीने काहीच केले नाही, त्यामुळे पक्ष सोडला – नरेंद्र पाटील

By PCB Author

September 05, 2018

मुंबई, दि. ५ (पीसीबी) – राष्ट्रवादीने मराठा समाजासाठी काही तरी केले असते, तर आपल्यावर पक्ष सोडण्याची वेळ आली नसती’, असा आरोप करत माथाडी कामगारांचे नेते नरेंद्र पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे राजीनामा पत्र पाठवले. राष्ट्रवादीशी संबंधित महाराष्ट्र प्रदेश लेबर सेलच्या अध्यक्षपदाचाही पाटील यांनी राजीनामा दिला आहे. दरम्यान, ‘मुख्यमंत्र्यांनी बोलावल्यास भाजपमध्ये प्रवेश करू’, असे त्यांनी भाजप प्रवेशावर आपली भूमिका व्यक्त केली आहे.

नरेंद्र पाटील यांना राष्ट्रवादीकडून मिळालेल्या विधान परिषद सदस्यत्वाची मुदत २७ जुलैलाच संपुष्टात आली होती. त्यानंतरही फडणवीस सरकारने नुकतीच त्यांची अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लावली आहे. त्यावेळीच पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे निश्चित मानले जात होते.

मनोहर जोशी यांनी मुख्यमंत्री असताना माझ्या वडिलांच्या नावाने मराठा समाजाच्या हितासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळ स्थापन केले होते. मात्र, त्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात हे महामंडळ डबघाईला आले. मात्र, दोन वर्षांपूर्वी मुख्यमंत्री फडणवीस यांनी या महामंडळासाठी दोनशे कोटींचा निधी दिला. आता या महामंडळाचे अध्यक्षपद आपल्याला मिळाले आहे. राष्ट्रवादीत राहून हे पद भूषविणे आपल्याला योग्य वाटत नाही,’ असे पाटील यांनी सांगितले.