Maharashtra

मराठा समाजासाठी राज्य सरकार कोणते निर्णय घेणार ? मंत्रिमंडळाची आज बैठक

By PCB Author

September 22, 2020

मुंबई,दि.२२(पीसीबी) – मराठा समाज आरक्षणासंदर्भात आज मंत्रिमंडळाची बैठक होणार असून त्यानंतरही एखादी बैठक घेऊन यासंदर्भात निर्णय घेण्यात येऊ शकतो. दरम्यान, मराठा आरक्षणावरची अंतरिम स्थगिती हटवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात विनंती अर्ज दाखल केला असल्याची माहिती मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांनी दिली आहे. मराठा आरक्षण संदर्भात काल (21 सप्टेंबर) मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा येथे बैठक पार पडली. त्यानंतर अशोक चव्हाण यांनी माध्यमांशी संवाद साधताना यासंदर्भात माहिती दिली. त्याआधी अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भेट घेतली होती.

सुप्रीम कोर्टात मराठा समाजाच्या आरक्षणाला स्थगिती मिळाल्यानंतर राज्य सरकार मराठा समजाला दिलासा देण्यासाठी निर्णय घेण्याची शक्यता आहे. दुर्बल घटकांसाठी (EWS) असलेले केंद्र सरकारचे आरक्षण मराठा समाजाला लागू करणार असल्याची माहिती मिळत आहे. तसेच सारथी संस्थेला जादा निधी देऊन मराठा समाजातील घटकांना मदत देण्यात येऊ शकते. तसेच मराठा विद्यार्थ्याच्या शिष्यवृत्तीच्या प्रतिपूर्तीचा निर्णय होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.