Maharashtra

मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण? मंत्रिमंडळ उपसमितीचा निर्णय   

By PCB Author

November 27, 2018

मुंबई, दि. २७ (पीसीबी) – मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यासंदर्भातील निर्णय मंत्रिमंडळ उपसमितीने  घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.  आरक्षणाबाबत मागासवर्ग आयोगाने केलेल्या शिफारसींवर योग्य ती पक्रिया करण्यासाठी मंत्रिमंडळ उपसमिती गठीत केली आहे. या समितीच्या  तीन बैठकीत  मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब केल्याचे सांगितले जात  आहे.

आयोगाने मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे अशी भूमिका घेतली. तसेच आयोगाच्या शिफारसी राज्य सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या आधी झालेल्या बैठकीत स्वीकराल्या आहेत. मात्र, मराठा समाजाला किती आरक्षण द्यायचे यासाठी उपसमिती गठीत केली होती. या उपसमितीने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेतल्याचे समजते. यानंतर आरक्षणाबाबतचे विधेयक गुरूवारी (दि.२९)  सभागृहात सादर केले जाणार आहे.

मराठा समाजाला आरक्षण मिळण्याच्या मागणीसाठी गेल्या अनेक दिवसांपासून  राज्यभरात मराठ्यांनी मोर्चे काढले आहेत. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारने सकारात्मक पावले उचलली. आता १६ टक्के आरक्षण देण्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे सांगितले जात आहे. परंतु याची अंमलबजावणी   होणार की नाही?  हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.