मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा – रामदास आठवले

0
714

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा समाजाला आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची मागणी आपण पहिल्यांदा  लोकसभेत केली होती.  या मागणीवर आपण ठाम आहोत. मराठा समाजाच्या आरक्षणाला रिपब्लिकन पक्षाचा पाठिंबा आहे, अशी ग्वाही रिपब्लिकन पक्षचे अध्यक्ष  केंद्रीय सामाजिक न्याय्य राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली.

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी केवळ राज्य सरकारकडून कायदा करून चालणार नाही. मराठा समाजाचे आरक्षण न्यायालयात टिकून राहण्यासाठी संसदेत आरक्षणाची मर्यादा ५० टक्‍क्‍यांहून ७५ टक्के करण्यासाठी कायदा करणे गरजेचा आहे. देशातील मराठा, ब्राह्मण, लिंगायत, जाट, गुज्जर आदी सवर्ण जातीतील आर्थिक दुर्बलांना स्वतंत्र प्रवर्ग करून २५ टक्के आरक्षण देणारा कायदा संसदेत करावा, असे मत आठवले यांनी व्यक्त केले.

अनुसूचित जाती जमाती आणि ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का न लागता मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे, असे मत  आपण राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या बैठकीतही व्यक्त केले होते, असेही आठवले यांनी सांगितले.