मराठा मोर्चा निघणार

0
190

बीड, दि. ५ (पीसीबी) – काही वर्षांपूर्वी मराठा क्रांती मुक मोर्चाने राज्यभरात 58 मोर्चे काढले होते. त्या मोर्चाला हजार दोन हजार नव्हे तर लाखोंच्या संख्येत लोक उपस्थित होते. ही संख्या पाहून फडणवीस सरकारची झोप उडाली होती. हा मोर्चा अत्यंत शांतीप्रिय मार्गाने काढण्यात आला होता. गेली 6 वर्ष मराठा आरक्षणाचा विषय राज्यभर पेटत आहे. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्द केल्यानं मराठा समाजाचा आक्रोश आणखीच वाढलेला दिसत आहे. त्यानंतर आता शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी पुन्हा मराठा मोर्चा निघणार असल्याचं सांगितलं आहे.

सर्वोच्च न्यायालयाने मराठा समाजाला दिले गेलेले सामाजिक आणि शैक्षणिक आरक्षण रद्द केल्यानंतर बीडमध्ये राज्यातील पहिला मराठा मोर्चा निघणार आहे. शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात येणार आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चाला पोलिसांनी परवानगी नाकारली आहे. तरीदेखील बीडमध्ये निघणाऱ्या मराठा क्रांती मोर्चासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे. मराठा क्रांती संघर्ष मोर्चासाठी पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. बीडमध्ये कितीही हजार पोलिसांचा बंदोबस्त असला, तरी मोर्चा निघणार, असं शिवसंग्राम संघटनेचे नेते विनायक मेटे यांनी म्हटलं आहे. तसंच हा मोर्चा यशस्वी करु. सध्या बीडमध्ये कार्यकर्ते यायला सुरुवात झाली आहे. पोलिसांनी पोलिसांचं काम करावं, मात्र कायदा सुव्यवस्था बिघडणार नाही याचीही दक्षता घ्यावी, असं विनायक मेटे म्हणाले.

दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात मोर्चे काढण्यासाठी संभाजीराजे छत्रपती यांचा विरोध दर्शवला आहे. कोरोनाच्या विळख्यात लोक सापडू नयेत त्यामुळे मोर्चे न काढता चर्चेतून मार्ग काढण्यास त्यांनी तयारी दर्शवली आहे. परंतू आता विनायक मेटे यांनी आंदोलनाचा नारा दिल्यानं कायदा सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न आता उभा राहू शकतो.