Maharashtra

मराठा क्रांती मोर्चाविरोधातील उच्च न्यायालयातील याचिका मागे घेणार   

By PCB Author

August 11, 2018

मुंबई, दि. ११ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा क्रांती मोर्चाने पुकारलेल्या आंदोलनाविरोधात ९ ऑगस्टला मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेली याचिका मागे घेण्यात येणार आहे,  अशी माहिती याचिकाकर्ते द्वारकानाथ पाटील आणि त्यांचे वकील आशिष गिरी यांनी दिली आहे.

मराठा आंदोलनादरम्यान सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करणाऱ्या आंदोलकांवर कारवाई करून त्यांच्याकडून नुकसानभरपाई वसूल करण्यात यावी, या मागणीसाठी याचिका  दाखल करण्यात आली होती.  मात्र, आता ही याचिका मागे घेण्यात येत आहे, असे आशिष गिरी यांनी सांगितले . याचिकाकर्ते  द्वारकानाथ पाटील यांनी ही याचिका मागे घ्यावी असे म्हटल्याने  याचिका १३ ऑगस्टला मागे घेणार आहे, असेही गिरी यांनी सांगितले.

मराठा मोर्चाच्या समन्वयकांनी तोडफोडीच्या घटनांची दखल घेतली आहे. तसेच यापुढे रस्त्यावर उतरून आंदोलन न करण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे आमच्या याचिकेचा हेतू साध्य झाला आहे. याच कारणामुळे आम्ही याचिका मागे घेत आहोत, असेही गिरी यांनी म्हटले आहे. ९ ऑगस्टला मराठा आरक्षणासाठी पुकारण्यात आलेल्या आंदोलनाला पुणे, औरंगाबाद, लातूर या ठिकाणी हिंसक वळण लागले होते. त्यामुळे ही याचिका दाखल करण्यात आली होती.

दरम्यान, बंदर पुकारणाऱ्या मराठा संघटना आहेत. मात्र, हिंसाचार करणारे कोण आहेत? याचा शोध घेण्यात यावा, अशी मागणी करून १५ ऑगस्टपासून मराठा संघटना चूलबंद आंदोलन करणार आहे, अशी माहिती  पुण्यात शुक्रवारी (दि.१०) घेतलेल्या पत्रकार परिषदेत  मराठा समन्वयकांनी दिली. तसेच औरंगाबाद येथील तोडफोडीची सीआयाडी चौकशी करण्याचीही मागणी करण्यात आली आहे. या आंदोलनात मराठा आंदोलकांऐवजी बाह्य शक्ती घुसल्या होत्या, असेही समन्वयक समितीने म्हटले आहे.