मराठा क्रांती मोर्चाला पिंपरी-चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद

0
685

पिंपरी, दि. ९ (पीसीबी) – मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन आज (गुरुवार) पुकारण्यात आलेल्या ‘महाराष्ट्र बंद’ ला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील सार्वजनिक वाहतूक, हॉटेल, बाजार पेठेतील दुकाने, औद्योगीक परिसरातील कंपन्यांनी कडकडीत बंद पाळला आहे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने बुधवारी रात्री ठिकठिकाणी रॅली काडून शहरातील व्यापारी संघटना, दुकानदारांना आज (गुरुवार) महाराष्ट्र बंदला पाठींबा म्हणून एक दिवसीय बंद पाळण्याचे आव्हान केले होते. याला आज पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शहरातील शाळा, कॉलेज बंद आहेत. तसेच दक्षता म्हणून जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सर्व परमीट रूम, देशी-विदेशी दारु विक्री केंद्रे, ताडी विक्री दुकानं बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. तर काही तुरळक मार्गांवर बससेवा सुरु आहे. यामुळे सगळीकडे शुकशुकाट पहायला मिळत आहे.

दरम्यान मराठा आंदोलकांनी शहरातील ठिकठिकाणी रॅली काडून आरक्षणाची मागणी करत घोषणा दिल्या. तर पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. शहरात कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रत्येक चौकांमध्ये पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. तसेच पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व नदी घाटांवर अग्निशमन दल आणि बचाव पथके तैनात करण्यात आले आहेत. तर मराठा क्रांती मोर्चाचे आंदोलक काही ठिकाणी पोलिसांना सहकार्य करताना दिसत आहेत.