Maharashtra

‘मराठा क्रांती मोर्चा’च्या नावाने पक्ष काढल्यास सडेतोड उत्तर देऊ; औरंगाबादेत समन्वयकांच्या बैठकीत ठराव

By PCB Author

September 17, 2018

औरंगाबाद, दि. १७ (पीसीबी) –  ‘मराठा क्रांती मोर्चा’ हे नाव समाजाची आस्था आहे.  सामाजिक एकता आणि अन्यायाविरुद्ध लढा उभारण्यासाठीच या नावाचा वापर करण्यात यावा. वैयक्‍तिक, पक्ष, संघटना बांधणीसाठी याचा कुणी वापर केल्यास समन्वयक आणि समाज त्यांना सडेतोड  उत्तर देईल, असा ठराव समन्वयकांच्या बैठकीत करण्यात आला.

मराठा क्रांती मोर्चातर्फे टीव्ही सेंटर, हडको परिसरात रविवारी बैठक झाली. मराठा क्रांती मोर्चाचे नाव वापरून राजकीय पक्ष सुरू करण्याची घोषणा केली  आहे. या पार्श्वभूमीवर  बैठकीत  समन्वयकांनी आपली मते मांडली .

मराठा क्रांती किंवा सकल मराठा या नावाने कुणी पक्ष काढत असेल तर, होणाऱ्या परिणामांना ते स्वत जबाबदार राहतील. मराठा क्रांती ही समाजाची आस्था आहे. ज्या वेळेस सामाजिक एकता, अन्यायाविरुद्ध लढा उभारायचा असेल त्या वेळेस मराठा क्रांती मोर्चा ताकतीने ते आंदोलन करतील. याचा  कुणीही वैयक्तिक कामासाठी किंवा पक्ष, संघटना बांधणीसाठी करू शकत नाही,  असा एकमताने ठराव यावेळी करण्यात आला.

यावेळी प्रा. चंद्रकांत भराट, सुरेश वाकडे,  मनोज गायके, अंकत चव्हाण, विजय काकडे, प्रदीप हारदे, रामेश्वर राजगुरे, बाळासाहेब औताडे,  संदीप सपकाळ, रमेश गायकवाड, अॅड. सुवर्णा मोहिते, सुनील कोटकर, शिवाजी जगताप, प्रशांत शेळके, योगेश औताडे, सतीश वेताळ आदी  उपस्थित होते.