Maharashtra

मराठा आरक्षण विधेयक दोन्ही सभागृहात गुरूवारी सादर करणार – मुख्यमंत्री फडणवीस

By PCB Author

November 26, 2018

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणाबाबतच्या विधेयकांवर कायदेतज्ज्ञ आणि अधिकारी  यांच्याकडून अखेरचा हात फिरवला जात आहे. त्यानंतर विधेयक तयार झाल्यानंतर गुरूवारी (दि.२९) दोन्ही सभागृहात मांडण्यात येणार आहे, अशी माहिती  मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार)  दिली.

राज्य सरकार मराठा आरक्षण विधेयक येत्या बुधवारी  विधानसभेत तर गुरुवारी  विधानपरिषदेत मांडणार असल्याची माहिती समोर आली होती. परंतु आता विधानसभा आणि विधानपरिषदेत एकाच दिवशी  गुरूवारी (दि.२९) विधेयक मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

दरम्यान, सरकार मागासवर्ग आयोगाच्या अहवालावर एटीआर म्हणजे अॅक्शन टेकन रिपोर्ट सादर केला जाणार आहे. आयोगाने दिलेल्या तीन शिफारशी स्वीकारुन सरकार विधेयक विधीमंडळात सादर करणार  आहे.  सरकार आरक्षणाबाबत गंभीर असून विरोधकांनी सहकार्य करावे, असे आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केले आहे.

दरम्यान, मागासवर्ग आयोगाच्या अहवालातील शिफारशीनुसार, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्याची शक्यता आहे. तर दुसरीकडे आरक्षणासंदर्भात गटनेत्यांच्या आज (सोमवार) दुपारी ३ वाजता होणारी बैठक रद्द झाली असून आता ही बैठक मंगळवारी सकाळी १० वाजता होणार आहे.