मराठा आरक्षण मिळू नये, यासाठी काँग्रेस, राष्ट्रवादीचा डाव; विनोद तावडेंचा विधानसभेत आरोप    

0
473

मुंबई, दि. २० (पीसीबी) – मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीने  ओबीसी समाजाच्या मनात भीती निर्माण केली आहे. त्यांनी मराठ्यांना आरक्षण मिळू नये, यासाठी   डाव रचला आहे. त्याच भाग म्हणून त्यांनी मागच्या दाराने प्रयत्न सुरु केले आहेत, असा घणाघाती आरोप राज्याचे शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज (मंगळवारी) विधानसभेत केला.  

 मराठा आरक्षणावरुन काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सत्ताधाऱ्यांना कोंडीत पकडले. सरकारने राज्य मागासवर्ग आयोगाचा अहवाल सभागृहात मांडावा. सत्ताधाऱ्यांचा हेतू चांगला नाही. त्यांना फक्त फसवणूक करायची आहे, असा आरोप विधान सभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे- पाटील यांनी केला. धनगर आरक्षणाबाबतचा ‘टीस’ने दिलेला अहवालदेखील सभागृहात मांडावा, असे त्यांनी सांगितले.

तर विधानसभेतील २८८ आमदारांचा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे. पण ५२ टक्क्यांना धक्का न लावता हे आरक्षण मराठ्यांना मिळावे. घटनात्मक पेच निर्माण होणार असेल तर मागासवर्गीय अहवाल सभागृहाच्या पटलावर ठेऊ नका, अशी भूमिका राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी मांडली.

यावर विनोद तावडे विधानसभेत उत्तर देताना म्हणाले की, सभागृहात अहवाल पटलावर ठेवण्याची  मागणी विरोधक करत आहे. अहवाल पटलावर येताच काही वकील याविरोधात न्यायालयात जातील. या पद्धतीने मराठा समाजाला आरक्षण मिळू नये, असा विरोधकांचा डाव आहे. आम्ही नियमाने कायद्याने, चांगले काम करत आहे. मात्र, विरोधी पक्ष मराठा समाजाला आरक्षण मिळू नये यासाठी मागच्या दाराने प्रयत्न करत आहेत, अशी टीका तावडे यांनी यावेळी केली.