Maharashtra

मराठा आरक्षण मंजूर केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे केले अभिनंदन

By PCB Author

December 03, 2018

वाशीम, दि. ३ (पीसीबी) – वाशीममधील आज (सोमवार) एका कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे एकत्र आल्याने भाजप- शिवसेना युतीचे संकेत मिळत आहेत. तर मराठा आरक्षण कायदा लागू केल्याबद्दल उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांचे जाहीररित्या अभिनंदन केले. तत्पूर्वी, मुख्यमंत्र्यांनी  उद्धव ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यावेळी त्यांचे कौतुक केले होते. त्यामुळे पुन्हा एकदा युतीच्या चर्चांना उधाण आले आहे.  

वाशिममध्ये बंजारा समाजाच्या संत सेवालाल मंदिर परिसरात विकास कामांचे आज ( सोमवारी) भूमिपूजन करण्यात आले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,  उद्धव ठाकरे, बालविकास मंत्री पंकजा मुंडे आदीसह नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, बंजारा समाजाला ज्या अडचणी भेडसावत आहेत, त्या सोडवणार आहे. मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या सुरुवातीला बंजारा भाषेत संवाद साधत बंजारा समाजाची मने जिंकली. तर सेवालाल महाराजांचे जागतिक दर्जाचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली

यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, प्रत्येकाला सन्मानाने जगण्याचा अधिकार आहे. बंजारा समाज हा लढवय्या समाज आहे. या समाजाला आपण शिक्षणाची सुविधा दिली, तर ते देशाचा आधारस्तंभ होतील. संत सेवालाल महाराज हे केवळ बंजारा समाजाचेच नव्हते ते संपूर्ण जगाचे होते.