मराठा आरक्षणासाठी हालचालींना वेग; मुख्यमंत्र्यांनी बोलावली बैठक  

0
891

मुंबई, दि. २६ (पीसीबी) – मराठा आरक्षणावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारमध्ये वेगवान हालचालींना सुरूवात झाली आहे. आज (गुरुवारी) रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विविध नेत्यांची बैठक घेऊन चर्चा करणार आहेत. तर दुसरीकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही वैयक्तिक भेटी घेत संवाद साधण्यावर जोर दिला आहे.  

मराठा समाजाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आज रात्री मुख्यमंत्र्यांनी एक मोठी बैठक बोलावली आहे.  यावेळी मंत्रिमंडळातील मराठा मंत्री, तसेच भाजपमधील काही ठराविक मराठा आमदारांना या बैठकीसाठी पाचारण केले आहे.

रात्री उशीरापर्यंत ही बैठक चालणार असल्याचे सांगितले जात आहे. तसेच सध्याची कोंडी फोडण्यासाठी भाजपच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे. दरम्यान, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या निवासस्थानी काही लोकांना चर्चेसाठी बोलावले होते. सध्याच्या परिस्थितीमध्ये तोडगा कसा काढायचा, कोंडी कशी फोडायची यावर विचारविनिमय करण्यात आला.