Maharashtra

मराठा आरक्षणासाठी नांदेडमध्ये आत्महत्येचा प्रयत्न, मुख्यमंत्र्यांच्या नावे भावनिक पत्र

By PCB Author

July 28, 2018

नांदेड, दि. २८ (पीसीबी) –  मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मुख्यमंत्र्यांच्या नावाने भावनिक पत्र लिहून एका व्यक्तीने फाशी घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांच्यावर नांदेड येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

 

नांदेड तालुक्यातील पिंपळगाव (महादेव) येथील वारकरी सांप्रदायिक प्रल्हादराव कल्याणकर गुरुजी यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नावे पत्र लिहून गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. त्यांची प्रकृती गंभीर आहे असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. पिंपळगाव (महादेव) येथील त्यांच्या राहत्या घराच्या छताला साडी बांधून गळफास घेऊन त्यांनी उडी घेतली. साडी बांधलेला गज वाकल्याने साडी निसटून ते खाली पडले. यानंतर त्यांना नांदेड येथील भगवती हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

 

प्रल्हाद गुरुजी यांनी आपल्या मुलाला आरक्षण नसल्यानेच सरकारी नोकरी मिळाली नाही. पुण्यात कंपनीत काम करावे लागत आहे. मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाला आरक्षण द्यावे मी समाजासाठी जीव देत आहे. हिंसक आंदोलन जाळपोळीमुळे देशाचे नुकसान होते, ती आपलीच राष्ट्रीय संपत्ती आहे, अशा आशयाचे कळकळीचे पत्र त्यांनी लिहिले आहे. 

त्यांच्या शर्टच्या खिशावर व इतरत्र एक मराठा लाख मराठा, जय महाराष्ट्र असा मजकूर लिहिला आहे. शेवटी सर्व मंत्र्यांना प्रणाम असे लिखाण असून पत्रामध्ये वारंवार आरक्षण द्या, अशी मागणी केलेली आहे.